पुणे : मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी येरवड्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सेतूवरून नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक २१ एप्रिलपर्यंत रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.
येरवड्यातील डाॅ. आंबेडकर पुलावरून तारकेश्वर मंदिरमार्गे वाहने नगर रस्त्याकडे जातात. मेट्रोच्या कामासाठी डाॅ. आंबेडकर पुलावरून नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत दररोज रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत बदल करण्यात येणार आहेत. २१ एप्रिलपर्यंत दररोज रात्री या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार असून, आवश्यकता भासल्यास डाॅ. आंबेडकर पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
हेही वाचा – सांगली रेल्वे स्थानकावर आणखी दोन गाड्या थांबणार
हेही वाचा – पिंपरी महापालिकेत सात गावांच्या समावेशाचा प्रस्ताव आठ वर्षांपासून धूळखात
वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून नगर रस्त्याकडे जावे, असे आवाहन उपायुक्त मगर यांनी केले आहे. वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे – पुणे स्टेशनकडून येरवड्याकडे जाणाऱ्या वाहनांनी मोबाज चौक, मंगलदास रस्ता, ब्ल्यू डायमंड हाॅटेल चौक, कोरेगाव पार्क चौकातून जुन्या पुलावरून पर्णकुटी चौकाकडे जावे. पुणे स्टेशनकडून बोटक्लबकडे जाणाऱ्या वाहनांनी मोबाज चौक, डावीकडे वळून ढोले-पाटील रस्त्याने इच्छितस्थळी जावे. बोटक्लब रस्त्याने येरवड्याकडे जाणाऱ्या वाहनांनी श्रीमान चौकातून अमृतलाल मेहता रस्त्याने कोरेगाव पार्क चौकातून इच्छितस्थळी जावे. येरवड्यातून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांनी पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, कोरेगाव पार्क चौक, ब्ल्यू डायमंड हाॅटेल चौकातून इच्छितस्थळी जावे.