नगर रस्त्यावरील पेरणे फाटा येथे रविवारी (१ जानेवारी) ऐतिहासिक स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन शनिवारी (३१ डिसेंबर)वाहतूक बदल करण्यात आले आहेत. अभिवादन सोहळ्यासाठी २० ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. १ जानेवारी रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू राहणार आहे.
हेही वाचा- विमानतळावरील सर्वेक्षणात पुण्यातील आणखी एका प्रवाशाला करोना संसर्ग
अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांना पेरणे फाटा परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. अन्य वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
वाहतूक बदल पुढीलप्रमाणे- पुण्याहून नगरकडे जाणारी जड वाहने खराडी बाह्यवळण मार्ग चौकातून हडपसर मार्गे वळविण्यात येणार. खराडी भागताील वाहने पुणे- सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे, न्हावरा, शिरूर, नगर रस्ता अशी जाणार आहेत. शिक्रापूर ते चाकण या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. नगरहून पुणे- मुंबईकडे येणारी जड वाहने शिरुर, न्हावरे फाटा, न्हावरे, पारगाव, चौफुला, यवत, सोलापूर रस्तामार्गे पुण्याकडे येतील. मुंबईहूनन नगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक करणारी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जातील. मोटार, जीप अशी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे नगरकडे जातील.