कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी वाहनचालकांसाठी मनस्ताप ठरत आहे. त्यातच आता नळस्टॉप चौकात दोन ठिकाणी महापालिकेने सुशोभीकरणासाठी १५ फूट जागा व्यापल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे महापालिकेचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला.
हेही वाचा- पुणे : नगर रस्त्यावर टेम्पोच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू
विधी महाविद्यालय रस्ता आणि कर्वे रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून महापालिकेने २५० कोटी खर्च करून बालभारती पौड रस्ता प्रस्तावित केला आहे. या रस्त्यासाठी टेकडीफोड होणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी या रस्त्याला आक्षेप घेतला आहे. एकीकडे पर्यायी रस्ता बांधण्यासाठी २५० कोटी खर्च करण्याची तयारी महापालिका करत असताना दुसरीकडे भर रस्त्यात सुशोभीकरणासाठी जागा व्यापण्यात आल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
हेही वाचा- मटण, मासळीवर ताव मारुन खवय्यांचा सरत्या वर्षाला निरोप; मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी गर्दी
वेलणकर म्हणाले, की विधी महाविद्यालय रस्त्यावरून पौड फाट्याकडे वळताना भर नळस्टॉप चौकात १५ फूट जागा विनाकारण सुशोभीकरणासाठी व्यापण्यात आली आहे. तसेच त्याच चौकात डावीकडे वळतानाही १५ फूट जागा सुशोभीकरणासाठी व्यापण्यात आली आहे. ही जागा व्यापून महापालिकेने मोठ्या वाहतूक कोंडीला निमंत्रण दिले आहे. त्यामुळे महापालिकेचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे.