पुणे : वाहतूक शाखेने ५९ ठिकाणी बदल केल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले असून शहरामध्ये रस्त्यांवरकील वाहतुकीच्या वेगामध्ये वाढ तर कोंडीमध्ये घट झाली आहे. वाहतूक कोंडीत आघाडीवर असलेल्या पुणे शहरात मागील सहा महिन्यांपासून म्हणजेच सप्टेंबर २०२४ पासून केलेल्या विविध उपाययोजनांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर गतवर्षीच्या तुलनेत वाहतूकीचा वेग १०.५ टक्क्यांनी वाढल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.
वाहतूक विभागाने शहरातील ५९ ठिकाणी प्रमुख बदल केले. तर सिग्नल सिंक्रोनायझेशन, वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण यामुळे हे शक्य झाल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी, पोलीस निरीक्षक सुनील गवळी या वेळी उपस्थित होते. शहरातील वाहतूक कोंडीची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अरूंद रस्ते, त्यात रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांसह इतर कारणांमुळे अनेक भागात कोंडी होते.
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिका एकत्रित काम करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलिसांनी शहरातील नगर रस्ता, सोलापूर रस्त्यावर विविध उपाययोजना करून त्या यशस्वी करून दाखविल्या आहेत. सध्या या दोन्ही प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढला आहे, असे पाटील यांनी सांगितले.
शहरातील प्रमुख रस्त्यांचा आढावा घेवून वाहतूक पोलिसांनी उपाययोजना केल्या, असे सांगून पाटील म्हणाले, ‘२६५ किलोमीटर अंतर असलेल्या एकूण ३३ प्रमुख रस्त्यांची निश्चित करून या रस्त्यांच्या सुधारणासाठी वाहतूक पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये वाहतूक अभियांत्रिकी बदल, तंत्रशुद्ध पद्धतीने वाहन संख्येच्या आधारे उजवीकडे आणि डावीकडे वळण बंद किंवा सुरू करणे, चिंचोळ्या रस्त्यावरील (बाॅटल नेक) कोंडी दूर करणे, वाहतुकीस अडथळा ठरणारे पीएमपीएमएलचे थांबे हलविणे, खासगी बसेस, रिक्षा स्थानके स्थलांतरीत करणे यासह इतर उपाययोजना केल्या. त्यामुळे या रस्त्यांवर वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत झाली आहे.’
एवढेच नाही तर रस्त्यांवर कोंडी होण्याची कारणे वाहतूक पोलिसांनी शोधली आहेत. यामध्ये काही वेळा अचानक अधिक संख्येेने येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होते. तर, काही वेळा नागरिकांच्या चुका, वाहने रस्त्यावर बंद पडणे, रस्त्यावर वाहतूक पोलीस नसणे यामुळेही कोंडी होत असल्याचे समोर आले आहे.
वाहतूक शाखेने केलेल्या उपाययोजना
रस्त्यांवरील उजवीकडील वळण बंद – १५
रस्ता रुंदीकरण (बॉटलनेक कमी केले) – १४
जंक्शन सुरू आणि बंद – ७
पीएमपी थांबे स्थलांतरीत – १०
खासगी बसेसचे थांबे – २
अडथळा ठरणारी अतिक्रमणे – ७
एकेरी मार्ग (वन वे) – २
आयलॅण्ड हटविणे – २
वाहने बंद पडल्याने सर्वाधिक कोंडी
वाहतूक पोलिसांनी शहराचा तीन महिन्यांचा आढावा घेतला आहे. त्यात सर्वाधिक कोंडी वाहने रस्त्यावर बंद पडल्याने झाल्याचे दिसून आले आहे. तीन महिन्यात तब्बल ११४ वेळा वाहने बंद पडल्याने कोंडी झाली. तर, बेशिस्तपणे वाहन लावणे, वाहन चालविणे, खड्डे, अपघात, रस्त्यांची कामे, वेगवेगळे कार्यक्रम तसेच सिग्नल बंद पडण्याच्या घटनांमुळे देखील कोंडी होत असल्याचे समोर आले आहे.