पुणे : शहरातील मध्यवर्ती पेठांचा भाग असलेल्या बाबा भिडे पुलावरून नदीपात्रातील रस्त्याने रजपूत वसाहतीमधून एरंडवणा येथे जाणारा रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे या भागात होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणाता सुटणार असून त्यामुळे दुचाकी वाहनचालाकांना मोठा दिलासा मिळणार आहे.हा रस्ता रुंद करण्यासाठी या भागातील सनदी अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या इमारतींची काही जागा आणि ओटा वसाहतीतील घरांची काही जागा ताब्यात घेण्यात येत आहे. पुढील आठवड्यात हे काम पूर्ण होईल.
शहराच्या मध्यवर्ती पेठांमधून कर्वेनगर, कोथरूड, वारजे तसेच सिंहगड रस्त्यावर राहणारे नागरिक ये-जा करण्यासाठी नदीपात्रातील रस्त्यांची वापर करतात. शहराच्या पश्चिमेकडील उपनगरांकडे जाण्यासाठी दुचाकीस्वारांना नदीकाठचा रस्ता अतिशय उपयुक्त आहे. बाबा भिडे पूल ते रजपूत झोपडपट्टी दरम्यानचा नदीपात्रालगतचा रस्ता अनेक दुचाकीचालकांकडून मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
या रस्त्याने डेक्कन जिमखाना कडून रजपूत झोपडपट्टीपर्यंत आल्यानंतर तेथून शहीद भगतसिंग मित्र मंडळापर्यंत जाणारा रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावर ओटा वसाहतीतील काही घरे आहेत. तसेच, नदीपात्रालगत सनदी अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेली मोठी सोसायटी आहे. या भागात सतत वाहतूक कोंडी होते. महापालिकेने दोन वर्षांपूर्वी या रस्त्याच्या विरूद्ध बाजूस रूंदीकरण केले होते. मात्र, रजपूत झोपडपट्टीकडून एरंडवण्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण बाकी होते.महापालिका सनदी अधिकाऱ्यांच्या इमारतीची जागा ताब्यात घेणार नाही. मात्र, आमची जागा ताब्यात घेईल, अशी भीती ओटा वसाहतीतील नागरिकांच्या मनात होती. त्यामुळे या रुंदीकरणाला विरोध होत होता.
महापालिकेच्या पथ विभागाने यावर तोडगा काढला आहे. या भागातील सनदी अधिकाऱ्यांच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी यासाठी महापालिकेला मदत केली. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले. पुढील काही दिवसांत हे काम पूर्ण होईल. यामुळे या भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
पावसकर म्हणाले, रस्ता रुंदीकरण करण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांच्या सोसायटीमधील आवश्यक जागेची मोजणी करून आतमध्ये सीमाभिंत बांधून दिली जात आहे. तर ओटा वसाहतीतील नागरिकांच्या घराबाहेरील जागेत प्रत्येकाला दोन पायऱ्या करून दिल्या जाणार आहेत. दोन्ही बाजूंनी रस्ता रुंद होणार आहे.