पुणे : ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील दुमजली उड्डाणपुलापैकी वाहतुकीसाठी असणाऱ्या पाषाणकडील रॅम्पसाठी लागणाऱ्या अतिरिक्त जागेचा प्रश्न अखेर सुटला आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयाच्या जागेचे समन्वयाने भूसंपादन करण्यात येणार आहे. जागा ताब्यात येताच तीन महिन्यांत रॅम्पचे काम पूर्ण करण्यात येईल,’ असा दावा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे महानगरपालिकेचे पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पीइएस संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, मुख्य अभियंता रिनाज पठाण आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक पार पडली. बैठकीत भूसंपादन आणि मोबदल्याबाबत समन्वयाने कार्यवाही करण्यास सहमती दिल्याचे डॉ. एकबोटे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

‘दुमजली उड्डाणपुलापैकी वाहतुकीसाठी असलेल्या पाषाणकडील रॅम्पसाठी परिसरातील ‘पीइएस’ संस्थेच्या मॉडर्न महाविद्यालयाची आणखी सुमारे चार हजार चौरस फूट जागा अपेक्षित आहे. या जागेत संस्थेचे बोटॅनिकल गार्डन, कॅन्टीन आणि विविध अभ्यासक्रमांचे वर्ग बाधित होत आहे. या गार्डनमध्ये विविध प्रकारच्या देशी विदेशी प्रकारचे वृक्ष, वनस्पतींच्या प्रजाती आहेत. महाविद्यालयातीलच एका जागेवर सुरक्षिपणे संबंधित वृक्षांचे प्रत्यारोपण करून देण्यात येणार असून, इतर जागेसंर्दभात मोबदल्याची अपेक्षित माहिती सोमवारपर्यंत (२७ जानेवारी) ‘पीएमआरडीए’कडे पाठविण्यात येणार आहे. याबाबत करार करून भूसंपदानास मान्यता देण्यात आली आहे,’ असेही डॉ. एकबोटे यांनी सांगितले.

पीएमआरडीए आणि पीइएस संस्थेमधील करारानुसार (एमओयू) बोटॅनिकल गार्डनमधील वृक्ष, वनस्पती सुरक्षितपणे प्रत्यारोपीत करून देण्यात येईल. महाविद्यालयातून जाणारी उच्च दाबाची विद्याुत वाहिनी स्थलांतरित करण्यात येत आहे. त्यानुसार अतिरिक्त जागेचा मोबदला देण्यात येणार असून, येत्या आठवडाभरात ही प्रक्रिया मार्गी लावणार आहे. महानगरपालिकेकडून रस्ता रुंदीकरण करून लोखंडी अडथळे उभे करून तातडीने रॅम्पच्या कामाला सुरुवात करून तीन महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येईल. – रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic congestion issues at pune university will be resolved due to land acquisition problem clear pune print news vvp 08 zws