पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागांत होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता दिवाळी होईपर्यंत वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमन करावे, असे स्पष्ट आदेश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले आहेत. तरीदेखील अद्याप शहराच्या मध्य भागासह उपनगरांमधील वाहतूक कोंडी कमी झालेली नाही. पोलीस आयुक्तांनी मात्र वाहतूक पोलीस रस्त्यावर असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा >>> पुणे : नगर महामार्गावर प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहतूक बंद ; शिक्रापूर-चाकण मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना

करोनामुळे गेली दोन वर्षे निर्बंध लागू होते. यंदा करोना संसर्ग कमी झाला असल्याने दिवाळीतील खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. परतीचा पाऊस लांबलेला असल्याने रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी दिवाळी होईपर्यंत अतिरिक्त मनुष्यबळ लावून केवळ वाहतूक नियमन करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. मात्र, शहरातील विविध पेठांसह शनिवार वाडा, शिवाजीनगर, डेक्कन परिसर, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन कॉलेज रस्ता), आपटे रस्ता, बाणेर, बालेवाडी, पाषाण, हडपसर अशा विविध उपनगरांसह अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. महत्त्वाच्या चौकांतही वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिक नागरिकांकडूनच वाहतूक नियमन केले जात आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही शहरातील वाहतूक कोंडी फुटलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Story img Loader