पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहराच्या २१ ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि नदीवरील पूल उभारण्याचे महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत सल्लागारांची नियुक्ती केली जाणार असून सल्लागाराच्या अहवालानंतर कामे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
शहरात वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. गर्दीच्या वेळी प्रमुख चौकात अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र सातत्याने दिसून येते. वाहतूक समस्येसंदर्भात नागरिक आणि स्वयंसेवी संस्था, प्रवासी संघटनांनी महापालिकेकडे उपाययोजना करण्याची मागणी वेळोवेळी केली आहे. त्यानुसार आता उड्डाणपूल, भुयारी मार्ग उभारण्याचे महापालिकेने नियोजित केले आहे.
हेही वाचा >>> डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा डाउनलोड करण्यात पुणे राज्यात आघाडीवर
मोठे रस्ते, नदी आणि लोहमार्ग अशा विविध ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहेत. सार्वजनिक खासगी लोकसहभागातून यापूर्वी काही ठिकाणच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ती कामेही सध्या सुरू आहेत, असे महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहराला दोन हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे. उड्डाणपूल, नदीवरील पूल आणि मोठ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच अन्य कामे करण्यासाठी महापालिका स्तरावर प्राथमिक अभ्यास करण्यात आला आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे.