पुणे : पुण्यासह बंगळुरू, गुरूग्राम, मुंबई, दिल्ली आणि चेन्नई या महानगरांमध्ये वाहतूक कोंडी वाढत आहे. यामुळे वाहतुकीस लागणारा वेळही वाढत आहे. याचा परिणाम भविष्यात या महानगरांतील उद्योगांवर होणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारे आणि स्थानिक प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत. अन्यथा छोट्या शहरांकडे गुंतवणूक वळू लागेल आणि ही महानगरांसाठी धोक्याची घंटा ठरेल, असा इशारा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बुधवारी दिला.
हेही वाचा >>> ओढ्यांलगत सीमाभिंती बांधण्याचा प्रश्न मार्गी; राज्य सरकारकडून महापालिकेला २०० कोटींचा निधी
विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात चंद्रशेखर बोलत होते. ते म्हणाले की, देशांतील अनेक महानगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या आहे. पुण्यासह बंगळुरू, दिल्ली, मुंबई, गुरूग्राम आणि चेन्नई या शहरांमध्ये ही समस्या बिकट बनली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगांना छोट्या शहरांकडे वळा, असा संदेश दिला होता. त्यातूनचही छोट्या शहरांमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. मागील काही काळात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क उभारण्यासाठी छोट्या शहरांना सरकारने पसंती दिली.
हेही वाचा >>> मुंबई, ठाणे, पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय
करोना संकटानंतर घरून काम करण्याची संस्कृती निर्माण झाली आहे. याचबरोबर दळणवळण यंत्रणाही सुधारली आहे. तसेच, छोट्या शहरांतून गुणवत्ता मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. यामुळे छोट्या शहरांना डिजिटल व्यवस्थेच्या माध्यमातून संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अनेक नावीन्यपूर्ण संशोधने छोट्या शहरांतून येत आहेत. त्यामुळे पुण्यासह इतर महानगरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. या महानगरांतील वाहतूक स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारे आणि स्थानिक प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत, असेही चंद्रशेखर यांनी नमूद केले.
आगामी काळात महानगरांतील वाहतूक स्थिती न सुधारल्यास गुंतवणूक छोट्या शहरांकडे वळेल. यासाठी शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत नागरिकांना प्रवास सहजपणे करता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. गुंतवणूक मिळविण्यासाठी आता महानगरांना छोट्या शहरांशी स्पर्धा करावी लागेल. – राजीव चंद्रशेखर, केंद्रीय राज्यमंत्री, माहिती तंत्रज्ञान