नगर रस्त्यावरील लांब पल्ल्याची थेट वाहतूक बंद करण्याचा निर्णय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर रस्त्यावर सातत्याने होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा फटका पीएमपीच्या गाडय़ांनाही बसला आहे. त्यामुळे नगर स्त्यावरील लांब पल्ल्याची थेट वाहतूक बंद करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला असून नगर रस्त्यावरील पाबळ, शिक्रापूर आणि तळेगाव ढमढेरे या मार्गावरील थेट सेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा यापुढे वाघोलीपर्यंत सुरू ठेवण्यात येईल.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड तसेच आसपासची गावे आणि काही अन्य गावांना पीएमपीकडून सेवा दिली जात होती. पीएमपीच्या महापालिका भवन स्थानकापासून नगर रस्त्यावरील पाबळ, शिक्रापूर आणि तळेगाव ढमढेरे या मार्गावर सेवा सुरू होती. त्याला प्रवाशांचा मोठा प्रतिसादही मिळत होता. मात्र नगर रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीत पीएमपीच्या गाडय़ा अडकत असल्यामुळे पीएमपीसी सेवा विस्कळीत होत होती आणि गाडय़ांनाही उशीर होत होता. प्रवाशांनाही त्यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे काही वेळा फेऱ्या रद्द करण्याची वेळही पीएमपी प्रशासनावर आली होती. त्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुळातच या मार्गावरील पीएमपीच्या फेऱ्या उपनगरातील फेऱ्यांच्या तुलनेत कमी होत्या. मात्र वाहतूक कोंडीत गाडय़ा अडकत असल्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावरील नियोजन कोलमडत होते. तीन महिन्यांपूर्वी पुणे स्टेशन ते राजगुरूनगर ही पीएमपीची फेरीही याच कारणास्तव बंद करण्यात आली होती.

पुणे स्टेशन ते राजगुरूनगर ही फेरी बंद करण्यात आल्यानंतर पुणे स्टेशनपासून भोसरीपर्यंत आणि भोसरी येथून राजगुरूनगरला जाण्यासाठी गाडय़ा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्याच धर्तीवर नगर रस्त्यावरही दोन टप्प्यात वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मार्गावरील फेऱ्यांच्या संख्येतही वाढ होणार असल्याचा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

नगर रस्त्यावरील लांब पल्ल्यांची वाहतूक वाघोलीपर्यंत होणार असून वाघोलीपासून पाबळ, शिक्रापूर आणि तळेगाव ढमढेरेसाठी गाडय़ा सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचून संचलनासाठीही जादा गाडय़ा उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी पीएमपीकडून नवे वेळापत्रक तयार करण्यात आले असून दर दहा मिनिटांच्या वारंवारितेने या मार्गावर गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. पीएमपीच्या फेऱ्या वाढणार असल्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नगर रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीत पीएमपीच्या गाडय़ा अडकत असल्यामुळे पीएमपीसी सेवा विस्कळीत होत होती आणि गाडय़ांनाही उशीर होत होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic crisis pmp also hit
Show comments