पुणे : मेट्रोच्या कामामुळे पीएमपीचे तीन मार्ग खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर एका मार्गावरील खेपांची संख्या वाढविण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या बुधवारपासून (११ ऑक्टोबर) होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिकांची कामे सुरू आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावर खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून पीएमपीच्या संचलनाला अडथळा निर्माण होत आहे. पीएमपीच्या गाड्यांच्या खेपा कमी होत आहेत. त्यामुळे प्रवाशांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत असून मार्गावर नियोजित वेळेत गाड्या उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक वारंवारीतेने गाड्या उपलब्ध होण्यासाठी लांब पल्ल्याचे तीन मार्ग मुख्य स्थानकापर्यंत खंडित करण्याचा निर्णय पीएमपीच्या वाहतूक विभागाने घेतला आहे.

हेही वाचा – पुणे : रेल्वेच्या आदेशाला ‘आरपीएफ’चा ठेंगा! स्थानकातील वाहनतळ हटविलाच नाही

अप्पर डेपो ते निगडी (बस मार्ग क्रमांक १२) हा मार्ग शिवाजीनगरपर्यंत खंडित करण्यात आला आहे. या मार्गावर सरासरी दहा मिनिटांच्या वारंवारीतेने गाड्या सोडण्यात येणार आहेत. भेकराईनगर ते हिंजवडी माण फेज-३ (बस मार्ग क्रमांक २०८) या मार्गावर धावणाऱ्या १२ गाड्यांपैकी ६ गाड्यांचा मार्ग महापालिका भवनापर्यंत खंडित करण्यात आला आहे. या मार्गावर दर २५ मिनिटांनी गाड्या सोडण्यात येणार असून उर्वरित सहा गाड्या भेकराईनगर ते हिंजवडी माण फेज-३ या मार्गावर नियमितपणे धावणार आहेत.

हेही वाचा – पुणे : रेल्वेच्या आदेशाला ‘आरपीएफ’चा ठेंगा! स्थानकातील वाहनतळ हटविलाच नाही

कात्रज ते वडगाव मावळ (बस मार्ग क्रमांक २२८) मार्ग मुकाई चौकापर्यंत खंडित करून खेपांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दर ३० मिनिटांनी या मार्गावर गाड्या धावणार असून मुकाई चौक ते वडगाव मावळ या मार्गवर तीन गाड्यांच्या मदतीने सेवा देण्यात येणार आहे. कात्रज ते निगडी- भक्ती-शक्ती या मार्गावर सहा गाड्यांची वाढ करण्यात आली असून एकूण २५ गाड्यांद्वारे सेवा दिली जाणार आहे. खंडित करण्यात आलेल्या मार्गावर दैनंदिन ३८० खेपा होत होत्या. मात्र नव्या बदलानुसार ४७२ खेपा होणार असल्याचा दावा पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic disruption due to metro works this route of pmp will be temporarily closed pune print news apk 13 ssb