पुणे : मराठा आरक्षणासाठी रविवारी (११ ऑगस्ट) मराठा आरक्षण शांतता फेरीचेआयोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत फेरी काढण्यात येणार असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सारसबाग परिसरातून रविवारी सकाळी अकराच्या सुमारास फेरीचा प्रारंभ होणार आहे. टिळक रस्त्यावरील पूरम चौक, बाजीराव रस्ता, शनिपार, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पूल, एसएसपीएमएस, स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक,जंगली महाराज रस्ता मार्गे फेरी काढण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना भागातील छत्रपती संभाजी पुतळा येथे फेरी विसर्जित होणार आहे. शहराच्या मध्यभागातून फेरी जाणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. फेरी मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागील रस्ते वाहतुकीस खुले करून दिले जाणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे : संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘बॉलर’ पबला पोलीस आयुक्तांकडून नोटीस

स्वारगेट परिसरातील जेधे चौक, सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.

वाहतूक वळविण्यात येणारे प्रमुख चौक

– नवले पुल – वाहतुकीचा आढावा घेऊन नवले पुलाकडून येणारी वाहतुक नवीन बोगद्याकडे वळविण्यात येईल.

– कोंढवा खडीमशीन चौक – जड वाहने कात्रजकडे न सोडता बोपदेव घाटमार्गे जातील.

– कात्रज चौकमार्गे फेरी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकमार्गे जाणार आहे.

– फेरी मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागील वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> सरकारने व्यापाऱ्यांसाठी ‘लाडके व्यापारी’ योजना जाहीर करावी- पुणे व्यापारी महासंघाची मागणी

सिंहगड रस्त्यावरील वाहतुक बदल

जेधे चौकातून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकमार्गे, मित्रमंडळ चौक, सावरकर चौकमार्गे जाणार आहे. सिंहगड रस्त्यावरुन येणाऱ्या वाहनांनी दांडेकर पूल, सावरकर चौक, मित्रमंडळ चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृहमार्गे इच्छितस्थली जावे. नीलायम चित्रपटगृह ते सावरकर पुतळा चौक वाहतूक बंद राहणार आहे. ना. सी. फडके चौक, सणस पुतळ्याकडे जाणारा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय ते पूरम चौक दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे.

स्वारगेट, सातारा रस्त्यावरील वाहतूक बदल

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, राष्ट्रभूषण चौकमार्गे जाणारी वाहने शंकरशेठ रस्त्याने इच्छितस्थळी जातील. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक ) ते जेधे चौक दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनांनी मार्केट यार्ड किंवा नेहरू रस्त्याने इच्छितस्थळी जावे. मार्केट यार्ड ते जेधे चौक दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. या भागातील वाहनांनी शिवनेरी रस्त्याने वखार महामंडळ चौकातून इच्छितस्थळी जावे. पंचमी हॉटेल ते जेधे चौक दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. पंचमी हॉटेल, शिवदर्शन चौक, गजानन महाराज मंदिरमार्गे वाहनचालकांनी पर्वती गावातून इच्छितस्थळी जावे. शिवदर्शन चौकातून मित्रमंडळ चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

फेरीचा प्रारंभ झाल्यानंतर बंद राहणारे रस्ते

शनिपार चौक ते कुमठेकर रस्ता, बेलबाग चौक ते लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, रमणबाग प्रशाला ते अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चैाक, जयंतराव टिळक पूल ते शनिवारवाडा, कुंभारवेस चौक ते गाडगीळ पुतळा, मंगला चित्रपटगृह ते प्रिमियर गॅरेज

शिवाजी पुतळा चौक ते शिवाजीनगर न्यायालय, रेव्हेन्यू कॉलनी ते मॉडर्न चौक, झाशीची राणी पुतळा चौक ते सावरकर भवन, महात्मा फुले संग्रहालय ते झाशीची राणी पुतळा चौक

डेक्कन जिमखाना भागातील वाहतूक बदल

गोखले स्मारक चौक ते नटराज चित्रपटगृह रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. काकासाहेब गाडगीळ पूल ते केळकर रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. रसशाळा चौकातून एस. एम. जोशी पूलमार्गे वाहतूक नळस्टाॅपकडे वळविण्यात येणार आहे. फेरी खंडोजीबाबा चौकात आल्यानंतर टिळक चौक ते खंडोजीबाबा चौक वाहतूक बंद राहणार आहे. या भागातील वाहतूक कुमठेकर रस्ता, टिळक रस्तामार्गे सोडण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic diversions in pune city for maratha reservation rally in presence manoj jarange patil pune print news rbk 25 zws