पुणे : डेक्कन जिमखाना परिसरातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी सोमवारपासून (२१ एप्रिल) बंद करण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पुलाच्या कामानिमित्त दीड महिने भिडे पूल परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. भिडे पूलमार्गे डेक्कन जिमखान्याकडे येणाऱ्या वाहनांनी टिळक चौक, खंडोजीबाबा चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. काकासाहेब गाडगीळ पूलमार्गे वाहनचालकांनी डेक्कन जिमखान्याकडे जावे. नारायण पेठेतील केळकर रस्ता, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूलमार्गे वाहनचालकांनी डेक्कन जिमखान्याकडे जावे.

भिडे पूलमार्गे नदीपात्रातील रस्त्याने मेहेंदळे गॅरेज चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक चौक, खंडोजीबाबा चौकमार्गे कोथरूड, कर्वेनगरकडे जावे. पूना हाॅस्पिटल परिसरातील पूल दुचाकी वाहनांसाठी खुला आहे. या पुलाचा वापर चारचाकी वाहनांनी करु नये. डेक्कन पीएमपी स्थानकातून नारायण पेठेकडे जाणाऱ्या वाहनांनी खंडोजीबाबा चौक, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

महामेट्रोकडून भिडे पूल परिसरात पादचारी केबल पूल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. भिडे पूल परिसरातील दोन्ही बाजूची वाहतूक सोमवारपासून बंद करण्यात येणार आहे. भिडे पूलाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. – अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा