वाहतूक पोलीस व पालिकेची निष्क्रियता, राज्यकर्त्यांची उदासीनता
वाहतूककोंडीचा जो त्रास पुणेकर आतापर्यंत अनुभवत आले आहेत, त्याची जणू रंगीत तालीमच पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू आहे. भलेमोठे रस्ते आणि मर्यादित वाहतूक असतानाही वाहनस्वारांची बेशिस्त, वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाची निष्क्रियता, हप्तेगिरी अशा कारणांमुळे शहरात जागोजागी वाहतूककोंडी होत आहे. महापालिकेने कित्येकांची घरे पाडून, दुकाने भुईसपाट करून अवाढव्य रस्ते तयार केले, त्याचा वापर वाहतुकीसाठी झालाच नाही. वाढलेल्या रस्त्यांवर अतिक्रमणे झाली, कोटय़वधी रुपये खर्च करून बांधलेले पदपथ गायब झाले, त्यामुळे पायी चालणारा माणूस हवालदिल झाला,
त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला. आतापर्यंत अनेकांचे जीव गेले, त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही.
पिंपरीकडून पुण्याच्या दिशेने जाताना दापोडी ओलांडली की वाहतूककोंडी म्हणजे नेमके म्हणजे काय असते, याची प्रकर्षांने जाणीव होते. तोच प्रकार सांगवीतून औंधला आल्यानंतर तसेच पुढे विद्यापीठ चौकात दिसून येतो. पुणे जसे विद्येचे, शिक्षणाचे माहेरघर झाले आहे, तसेच वाहतूककोंडींचे शहर अशीही पुण्याची ओळख बनली आहे. िपपरी-चिंचवड म्हणजे पुण्याचे जुळे शहर. पुण्याच्या वाहतूककोडींवरून आतापर्यंत िपपरीकर नाक मुरडत होते. आमच्याकडे भलेमोठे रस्ते आहेत, वाहतूक नेहमीच सुरळीत राहते. एखादा अपवाद वगळता वाहतूककोंडीचा विषयच येत नाही, असे पिंपरी-चिंचवडकर अभिमानाने सांगत राहिले. आता मात्र तशी परिस्थिती राहिली नाही. गेल्या काही दिवसांमधील परिस्थिती पाहता, शहरातील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. पिंपरी-चिंचवडमधील असे एकही गाव किंवा शहरातील असा एकही भाग राहिला नसेल, ज्या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या भेडसावत नसेल. शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तातडीने योग्य उपाययोजना न केल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये पुण्याप्रमाणे वाहतूककोंडीची भीषण समस्या फोफावलेली दिसून येईल आणि तेव्हा सगळे काही हाताबाहेर गेलेले असेल, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.
पिंपरी कॅम्पचा संपूर्ण परिसर, पिंपरी चौक, रेल्वे स्टेशन परिसर, चिंचवड स्टेशन ते चिंचवडगाव रस्ता, मोरवाडी सिग्नल ते बॉम्बे सिलेक्शनपर्यंतचा रस्ता, काळेवाडी फाटा ते डांगे चौक, थेरगाव तसेच हिंजवडीकडे जाणारे सर्व रस्ते, पिंपरी ते खराळवाडी रस्ता, नेहरूनगर रस्ता, भोसरी उड्डाणपुलाखालील परिसर, भोसरी-आळंदी रस्ता, तळवडे, निगडी, आकुर्डी, मासूळकर कॉलनी, संभाजीनगर ते चिखली, मोशी, वाकड, रहाटणी, काळेवाडी, सांगवी, स्पायसर रस्ता तसेच दापोडी, कासारवाडी, डेअरी फार्म येथील रेल्वे गेट परिसर अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. जिथे दररोज वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतो. अंतर्गत भागातही छोटय़ामोठय़ा कारणांमुळे वाहतूककोंडीच्या समस्येने भीषण स्वरूप धारण केले आहे. त्याचा त्रास लाखो नागरिकांना होतो आहे.
‘आयटी हब’ हिंजवडीकडे जाणारे सर्व रस्ते ‘वाहतुकीचे तीन तेरा’ कसे झालेत, हे दाखवून देण्यासाठी उत्तम उदाहरण आहे. सकाळी सातपासूनच वाहनांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या या रस्त्यांवरून जाणाऱ्या लाखो वाहनस्वारांना रोज काय भोगावे लागते, याची कल्पना करवत नाही. हीच परिस्थिती थोडय़ाफार फरकाने शहराच्या अन्य भागांतही आहे. भोसरीत १०० कोटींपेक्षा अधिक खर्च करून उड्डाणपूल बांधला, त्याचा अपेक्षित उपयोग झाला नाही. जागोजागी वाहतूककोंडी असल्याने भोसरीतून मार्ग काढताना वाहनस्वारांच्या नाकीनऊ येते. चिंचवडला जाताना मोरवाडीचा सिग्नल ओलांडला, की वाहनांचा वेग मंदावतो. रस्त्यावर उभ्या-आडव्या पद्धतीने वाहने लावण्यात येतात. ‘जयहिंदू’, ‘रांका’ या मोठय़ा दुकानांमध्ये येणारा ग्राहक रस्त्यावर गाडय़ा लावून तासन्तास खरेदीत रमतो. ‘नो पार्किंग’च्या फलकाशेजारीच आलिशान मोटारी लावलेल्या असतात. वाहतूक पोलीस डोळय़ांवर पट्टी बांधून असतात. रस्त्याच्या दुतर्फा असलेले मॉल म्हणजे सर्वाची डोकेदुखी बनले आहेत. सायंकाळी साडेपाचनंतर मॉलमध्ये येणाऱ्यांची गर्दी वाढू लागते आणि रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात, त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होतो. आनंदनगरमध्ये ‘रॉँग साईड’ने येणाऱ्या वाहनस्वारांमुळे खोळंबा होतो. चिंचवडच्या नाटय़गृह चौकात मुळात अरुंद रस्ता आहे. तेथे ऐन गर्दीच्या वेळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोठय़ा बस रस्ता अडवून थांबतात, त्यांच्यावर कारवाई होत नाही. निगडीतही तीच परिस्थिती आहे. वाहतूक पोलिसांना रग्गड पैसे मिळत असल्याने ते याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. काळेवाडी फाटा ते डांगे चौक रस्त्यावर वाहतुकीसाठी अतिशय छोटा रस्ता उपलब्ध असतो. दुकानदारांचे अतिक्रमण, पथारीवाले, हातगाडीवाले, छोटे-मोठे विक्रेते यांनी रस्ता व्यापून टाकला आहे. रिक्षावाले, टेम्पोवाले यांच्यासह चारचाकी व दुचाकी वाहने रस्त्यावर उभी असतात, याचा व्हायचा तो परिणाम होतो. दूरदूपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. कासारवाडी तसेच पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे फाटक परिसरात होणारी वाहतूककोंडी कित्येक वर्षांपासूनची समस्या आहे. डेअरी फार्मच्या उड्डाणपुलाचा विषय अजूनही रखडलेलाच आहे, तर कासारवाडीत पर्यायी रस्ते उपलब्ध असूनही त्याचा वापर होत नसल्याने मूळ समस्या कायम आहे.
भलेमोठे रस्ते असतानाही पिंपरी-चिंचवडकरांना दररोज तीव्र वाहतूककोंडीला का सामोरे जावे लागते, याचा गांभीर्याने विचार होताना दिसत नाही. महापालिकेने डोळय़ांवर पट्टी बांधून घेतली आहे. पालिकेच्या मालकीचे रस्ते, भूखंड यावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. पदपथांवर दुकाने थाटली आहेत, मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. पालिकेचा अतिक्रमण विभाग नावाला राहिला आहे. अनेक ठिकाणी रिक्षावाल्यांची मुजोरी आहे. पिंपरी चौकात वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून रिक्षावाल्यांची मनमानी सुरू असते. पोलीस काही करू शकत नाहीत. खालपासून वपर्यंत हप्त्यांची सोय झाली असल्याने कानाडोळा केला जातो. काही ठिकाणी स्थानिक मंडळी हातगाडी, पथारीवाल्यांकडून सक्तीने भाडे वसूल करतात. वाहतूक पोलिसांची जागोजागी खाबूगिरी सुरू आहे. सर्वसामान्यांना छळण्याची कोणतीही संधी न सोडणारे पोलीस पैशाची सोय होत असलेल्या ठिकाणी अतिशय लवचिक भूमिका घेतात. चिंचवडच्या एम्पायर इस्टेट, नाटय़गृह चौकात होणाऱ्या वाहतूककोंडीला पोलिसांची हप्तेगिरी हेच प्रमुख कारण आहे. कासारवाडी, शंकरवाडी भागांत ‘कार डेकोरेटर्स’ मंडळींनी पालिकेचा सेवा रस्ता अक्षरश: गिळंकृत केला आहे. थेट रस्त्यावर वाहनांच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असते, वाहनांच्या दूरदूपर्यंत रांगा लागतात, मात्र तिकडे ढुंकूनही पाहिले जात नाही, कारण तिथे पालिकेचे अधिकारी आणि पोलिसांची खाऊगल्ली आहे. ही परिस्थिती सुधारणार आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो, कारण शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळेच वाहतुकीचा विचका झाला आहे.
मंगल कार्यालयांची डोकेदुखी
शहराच्या विविध भागांत असलेली मंगल कार्यालये तसेच सभागृहे या वाहतूककोंडीत भर घालण्याचे काम करतात. पिंपरी, रहाटणी, काळेवाडी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, रावेत, हिंजवडी, निगडी, भोसरी, चऱ्होली आदी ठिकाणी असलेली मंगल कार्यालये नागरिकांच्या मनस्तापाचे कारण ठरली आहेत. विवाह सोहळे तसेच अन्य कार्यक्रमांसाठी या ठिकाणी मोठय़ा संख्येने नागरिक येतात. त्यांची वाहने उभ्या-आडव्या पद्धतीने रस्त्यावर लागतात. काही ठिकाणी पार्किंगची सोय असूनही नागरिक त्याचा वापर करत नाही. त्यामुळे गर्दीच्याच वेळेत वाहतुकीचा खोळंबा होतो. यानिमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना सामोरे जाणे म्हणजे भीषण अनुभव बनला आहे. वाहतुकीचा खोळंबा करून स्पीकरच्या भिंती लावून वऱ्हाडी मंडळी नाचगाण्याचा आनंद लुटत असतात. आपल्यामुळे वाहनस्वारांना त्रास होतो आहे, हे त्यांच्या गावीही नसते. काही ठिकाणी अशी जाणीव असूनही जाणीवपूर्वक धांगडिधगा सुरू असतो. एखादी रुग्णवाहिका अथवा अग्निशामक दलाची वाहने वाहतूककोंडीत अडकली तर ‘नको ते’ घडण्याचा धोका अधिक आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम कोणाचे आहे, त्यांनाच काही घेणंदेणं नाही. मंगल कार्यालये व सभागृहांच्या मालकांकडून पोलिसांना पैसे मिळतात. काही प्रसंगी ज्यांचे कार्य आहे, ते हात ढिला सोडतात. राजकीय दबाव असतोच. मग, कारवाई करण्याचे धाडस पोलीस करतील का? असाही प्रश्न आहे.
पिंपरी कॅम्पसाठी कोणतीच नियमावली नाही
पिंपरी बाजारपेठेत वाहतुकीची सर्वाधिक ऐशीतैशी झाली आहे. या ठिकाणी कोणत्याच प्रकारची नियमावली अस्तिवात नाही, असे वातावरण आहे. कोणीही उठतो आणि स्वत:ची मनमानी करतो. शासकीय यंत्रणा असून नसल्यासारखे आहे. पिंपरीतील व्यापाऱ्यांनी जागोजागी अनधिकृत बांधकामे केली असून वाहतुकीच्या रस्त्यांवर प्रचंड अतिक्रमण केले आहे. काहींनी थेट रस्त्यावरच दुकाने मांडली आहेत. महापालिका त्यांच्यावर कारवाई करत नाही. अतिक्रमण कारवाई आणि पिंपरी यांचा कधी संबंधच येत नाही. राजकीय नेत्यांच्या दबावामुळे पोलीस व महापालिकेकडून कारवाई होत नाही. व्यापाऱ्यांचीही दादागिरी आहेच. वाहतूक पोलिसांच्या साक्षीने नियमांची पायमल्ली सुरू असते, मात्र ते अवाक्षर बोलत नाहीत. अल्पवयीन मुले वेगाने वाहने चालवतात, पोलिसांना ते कधीच दिसत नाही. ‘दोन नंबर’चे म्हणून ओळखले जाणारे अनेक धंदे पिंपरी कॅम्पमध्ये उघडपणे होतात. शासकीय यंत्रणेला त्याची पुरेपूर माहिती आहे, मात्र ‘खाबूगिरी’मुळे कोणी काही करत नाही.