पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून स्वतंत्र आराखडा; दिवाळीनंतर काम सुरू होण्याची शक्यता

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतून हिंजवडीकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीची आणि त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची उशिरा का होईना पालिकेने दखल घेतली आहे. शहर हद्दीतील तीन किलोमीटर व पुढे हिंजवडीतील दोन किलोमीटर असे सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील रस्तेविकासाचा जवळपास ३५० ते ५०० कोटी रुपये खर्चाचा आराखडा पालिकेने तयार केला आहे. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यास दिवाळीनंतर काम सुरू करण्याचे नियोजन आहे. जवळपास ३६ महिने मुदतीचे हे काम पूर्ण झाल्यानंतर हिंजवडीतील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी दूर होईल, असा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.

वाकड येथील कस्पटे चौक, मानकर चौक, शौर्य चौक, वाकड चौक आणि राजीव गांधी उड्डाणपूल अशा पाच ठिकाणी मिळून हा रस्तेविकासाचा एकत्रित आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, कस्पटे चौकात चक्राकार वाहतूक, रॅम्प, अंडरपास आणि पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग राहणार आहे. मानकर चौकात स्थानिक रहिवाशांसाठी सेवा रस्ते राहणार असून मुख्य उड्डाणपुलाला जोडण्यासाठी रॅम्प असणार आहेत. शौर्य चौकात मानकर चौकाप्रमाणेच रचना असणार आहे. वाकड चौकात ‘टी’ आकाराचा ग्रेड सेपरेटर राहणार असून बीआरटी मार्गावरूनच उड्डाणपूल नेण्यात येणार आहे.या रस्तेविकास आराखडय़ासाठी ३५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या आराखडय़ास हिरवा कंदील दाखवला आहे. निम्मा खर्च केंद्र सरकारने करावा, अशी मागणीही केल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी सांगितले. पालिका हद्दीतील तीन किलोमीटर पुरता मर्यादित आराखडा न करता त्यापुढे हिंजवडीतील टप्पा ३ पर्यंत रस्तेविकासाची कामे करण्याची सूचना सत्ताधारी नेत्यांनी केली आहे. हिंजवडीतील दोन किलोमीटरचा समावेश या आराखडय़ात करण्यात आल्यास खर्चाचा आकडा वाढून ५०० कोटींपर्यंत जाऊ शकतो, असे सांगण्यात आले. खर्चाची रक्कम मोठी असल्याने केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिका मिळून संयुक्त खर्चाचा प्रस्तावही आहे. आराखडय़ाच्या मान्यतेचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ३६ महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर, हिंजवडीतील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी झालेली असेल, असा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.