दहीहंडीमुळे शहराच्या मध्यभागामध्ये रस्तोरस्ती जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे मोठय़ा प्रमाणातील वाहतूक कोंडीचा अनुभव गुरुवारी पुणेकरांना आला. प्रमुख रस्त्यांवरही दहीहंडीचे औचित्य साधून ध्वनिक्षेपकाच्या भिंती उभारून कर्णकर्कश आवाजातील संगीत लावल्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीबरोबरच ध्वनिप्रदूषणाचाही अनुभव आला. कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांच्या गाठीशी मात्र, वाहतूक कोंडीमध्ये सापडण्याची नामुष्की ओढवली.
काही मंडळांनी या पारंपरिक सणाला सामाजिक बांधिलकीचे अधिष्ठान दिले. सुवर्णयुग तरुण मंडळाने कोल्हापूर येथील शहीद कुंडलिक माने कुटुंबीयांना एक लाख रुपयांचे अर्थसाह्य़ केले. अकरा मारुती कोपरा मंडळाने साकारलेली हंडी कोथरूड येथील अंधशाळेच्या मुलींनी फोडली. अखिल मंडई मंडळाने १५ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले असून त्यांना धनादेश प्रदान करण्यात आले. नेहरू तरुण मंडळाने पुस्तक हंडी साकारली. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आणि पुणे विचारपीठ यांच्यातर्फे ससून रुग्णालयामध्ये रुग्णांना दूधवाटप करून मानवतावादी रुग्णसेवेची हंडी साजरी करण्यात आली. दहीहंडीमुळे शहराच्या मध्यभागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता हे मुख्य मार्ग बंद झाल्याने दुचाकीस्वारांना दूरच्या रस्त्यांनी जावे लागले. तर लक्ष्मी रस्त्याने बस चालविणे पीएमपी वाहनचालकांसाठी तारेवरची कसरत ठरली.
दहीहंडी नव्हे, ही तर वाहतूक कोंडी
प्रमुख रस्त्यांवरही दहीहंडीचे औचित्य साधून ध्वनिक्षेपकाच्या भिंती उभारून कर्णकर्कश आवाजातील संगीत लावल्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीबरोबरच ध्वनिप्रदूषणाचाही अनुभव आला.
First published on: 30-08-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam because of dahi handi