पिंपरीः चिंचवड स्टेशन ते चिंचवडगाव दरम्यानच्या उड्डाणपुलावर दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. कित्येक महिन्यांपासून ही परिस्थिती उघडपणे दिसत असतानाही यासंदर्भात वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त असतानाही वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने जागोजागी वाहतूक कोंडी असल्याचे चित्र दिसून येते. चिंचवडचा उड्डाणपूल हा त्यापैकीच एक आहे.
हेही वाचा >>> हृदयद्रावक: शाळेत चाललेल्या माय- लेकाचा भीषण अपघात, आईसमोरच मुलाचा मृत्यू
दररोज सकाळी नऊ ते साडेअकरा तसेच संध्याकाळी चिंचवडच्या उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी होते. सकाळी कामासाठी निघालेल्या नोकरदारांची तसेच शाळा-महाविद्यालयात निघालेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते. या चौकात वाहतूक पोलीस असूनही त्यांना ही कोंडी दूर करता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुलाजवळचा सिग्नल ओलांडण्यासाठी वाहनस्वारांना ताटकळत थांबावे लागते. विरूध्द दिशेने जाणारे वाहनस्वार, पुलावरच असलेले थांबे अशी इतर कारणेही आहेत. या कोंडीसंदर्भात नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्या आहेत. तथापि, अद्याप याविषयी तोडगा निघू शकलेला नाही.