मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पुलाजवळ कंटेनर आणि चार चाकी वाहनाचा अपघात झाला आहे.  जीपला धडक दिलेला कंटेनर रस्त्यात फिरल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये जीपमधील दोघेजण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. जीपला धडक दिल्यानंतर रस्त्यात कंटेनरने मोठा अडथळा निर्माण केला होता.

सू्त्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर बाजूला करण्यात आला असून या मार्गावरील वाहतूक  हळूहळू पूर्वपदावर येत आहे.  अपघातानंतर पुण्याच्या दिशेने येणारी वाहने छेद रस्त्यावरून मुंबईच्या दिशेने वळविण्यात आली होती. दोन्ही मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाल्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. पुण्याकडे येणार्‍या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मदत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कंटेनर बाजूला करण्यात आला असून या मार्गावर धीम्या गतीनं वाहतूक सुरु झाली आहे.