वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेचा भाग म्हणून चिंचवड स्टेशन ते आकुर्डी दरम्यानच्या पट्टय़ात दोन्ही बाजूने ‘नो पार्किंग’ करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या निर्णयास दोन्हीकडील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. पिंपरी पालिका तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून परस्पर हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक प्रसाद शेट्टी यांनी केला असून पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
माजी खासदार गजानन बाबर यांच्या अध्यक्षतेखाली चिंचवड येथे व्यापाऱ्यांची तातडीची बैठक झाली, त्यात वाहतूक पोलिसांच्या या कृतीवर तीव्र आक्षेप घेण्यात आला. या ठिकाणी उड्डाणपुलाची आवश्यकता असताना तेथे ग्रेड सेपरेटर करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून दररोज वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यातच ‘नो पार्किंग’ लागू झाल्यास अडचणीत आणखी भर पडेल, अशी भीती व्यापाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली. यासंदर्भात, वाहतूक पोलिसांनी परस्पर घेतलेल्या निर्णयाविरूध्द प्रसाद शेट्टी यांनी आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे तक्रार केली. यासंदर्भात, १७ एप्रिलला पुन्हा बैठक होणार असल्याचे शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा