पिंपरी : गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर आयोजित गायक अरिजित सिंग याच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. देहूरोड परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

गायक अरिजित सिंग याच्या रविवारी गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या दिशेने मोठ्या संख्येने वाहने चालली आहेत. देहूरोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहनचालकांना १५ मिनिटे जागेवर थांबावे लागत आहे. तीनवेळा सिग्नल लागत आहे. वाहतूक कोंडीने चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वाहतुकीत बदल

या कार्यक्रमामुळे पोलिसांनी देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. आज रविवारी दुपारी एक ते रात्री बारा वाजेपर्यंत हा बदल आहे. ज्या वाहनधारकांकडे अति महत्वाचे (व्हीव्हीआयपी), महत्वाचे (व्हीआयपी), अत्यावश्यक सेवा वाहनाचा पास असलेली वाहने द्रुतगती मार्गाच्या उजव्या बाजूने सोडण्यात येत आहेत. मुंबईकडून येणा-या प्रेक्षकांच्या वाहनांना देहूरोड एक्झिट मधून डावीकडे वळून मामुर्डी गाव मार्गे, मुकाई चौकातून युटर्न घेऊन सिम्बायोसिस महाविद्यालय मार्गे, शितलादेवी मंदिर येथून लेखा फार्म मार्गे स्टेडियमकडे सोडले जात आहे. देहूरोड सेंट्रल चौकाकडून येणारी वाहने किवळे पुलाखालून मामुर्डी भुयारी मार्गाच्या डाव्या बाजूने, तसेच सेंट्रल चौकातून साई नगर फाटा मार्गे जात आहेत. जुना मुंबई-पुणे हायवेने येणारी वाहने सोमाटणे फाटा, सेंट्रल चौक मार्गे बेंगलोर हायवे वरील मामुर्डी जकातनाका जवळील अंडरपास व रस्त्याने येणाऱ्या वाहनांना शितलादेवी मंदीर येथून मामुर्डी गावात जाण्यास मनाई केली आहे.

पुणे बाजुकडून येणा-या प्रेक्षकांच्या वाहनांना किवळे ब्रिज मार्गे द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूने सोडले जात आहे. निगडी हँगिंग ब्रिज कडून येणारी वाहने कृष्णा चौकातून द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूने जात आहेत. गहुंजे पुल ते वाय जंक्शन मार्गे स्टेडियमकडे अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश दिला जात आहे. मामुर्डी गावातील रूहिझ बिर्यानी ते मासुळकर फार्म बाजुकडे जाण्यास वाहनांना प्रवेश बंदी आहे. या मार्गावरील वाहने मामुर्डी जकात नाका मार्गे जात आहेत. मरीमाता चौक किवळे नाला येथुन मासुळकर फार्म बाजुकडे येण्यास प्रवेश बंद आहे. या मार्गावरील वाहने कृष्णा चौकातून जात आहेत. पोलिसांनी नियोजन करूनही देहूरोड परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे.

Story img Loader