पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाटय़ाजवळ रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ट्रक व कंटेनरमध्ये झालेल्या धडकेत कंटेनर चालक ठार झाला असून, ट्रकमधील दोन जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्यामुळे पुणे व मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास विस्कळीत झाली होती. दुपारी बाराच्या सुमारास वाहतूक द्रुतगती मार्गावर वळवून कंटेनर बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
भानुदास नाना लोंढे (वय ३५, रा. सातारा) हे मृत्यू झालेल्या कंटनेर चालकाचे नाव आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे लोखंड भरलेले ट्रक जात होता. तर मुंबईहून पुण्याकडे अवजड कंटेनर येत होता. पहाटे पाचच्या सुमारास कार्ला फाटय़ाजवळ ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक कंटेनरवर जाऊन आदळला. या अपघातात कंटेनर रस्त्यावर आडवा झाला आणि पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्याची बाजू बंद झाली. पुढे जाण्याच्या नादात काही वाहने पुढे आल्यामुळे रस्त्याची दुसरी बाजूही बंद झाल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. रस्त्यावर आडवा झालेला कंटनेर काढण्यासाठी बोलविण्यात आलेली क्रेन घटनास्थळी पोहोचण्यास दोन तास लागले. तो कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी एक तास गेला. सकाळी साडेसहा ते अकरा या कालावधीत वाहतूक बंद होती. दरम्यान काही वाहतूक द्रुतगती मार्गावर वळविण्यात आली. क्रेनच्या मदतीने कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. दुपारी बाराच्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा