नाताळला जोडून आलेल्या सलग सुट्टयांमुळे शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या द्रुतगती मार्गावरील लेनवर प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. अमृतांजन पूल ते खालापूर टोलनाका दरम्यानचे १२ ते १५ किलोमीटर अंतरा कापण्यासाठी प्रचंड वेळ लागत होता. रस्त्यावर झालेल्या वाहनांच्या अफाट गर्दीमुळे वाहनांची गती मंदावली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सलग सुट्टयांमुळे पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून मुंबईकर मोठय़ा संख्येने खासगी वाहने घेऊन घराबाहेर पडले. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. द्रुतगती मार्गावर कोठेही दुर्घटना नाही. मात्र, एकाच वेळी हजारोंच्या संख्येने वाहने या मार्गावर आल्याने द्रुतगती महामार्गाच्या तीनही लेन वाहनांच्या संख्येने हाऊसफुल्ल झाल्या आहेत. वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर तनात करण्यात आले आहेत. मात्र वाहनांची संख्याच इतकी प्रचंड आहे की त्यांना सामावण्यासाठी तीन पदरी द्रुतगती महामार्गदेखील कमी पडला, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
घाटामध्ये दोन कंटेनर बंद पडल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली असावी अशी शंका प्रारंभी आली होती. मात्र, नंतर ही कोंडी नसून वाहनांची संख्या वाढल्याने लागलेल्या रांगा होत्या असे ध्यानात आले. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ही कोंडी कमी न झाल्याने पर्यटकांना शुक्रवारचा दिवस ‘ट्रॅफिक जॅम’मध्ये काढावा लागला.
२० मिनिटांच्या अंतरासाठी तीन तास
खालापूर टोलनाका ते लोणावळा हे अंतर एरवी अवघ्या २० मिनिटांतअंतर पार करता येते. शुक्रवारी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे हे अंतर कापण्यासाठी  किमान तीन तासांचा अवधी लागला. नाताळनंतर आता पर्यटकांना नवीन वर्षांच्या स्वागताचे वेध लागले आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवस द्रुतगती महामार्गावर वाहनांची वर्दळ ही किमान चारपटीने वाढण्याची शक्यता आहे. लोणावळा शहरामध्ये मोठय़ा संख्येने पर्यटक येणार असल्याने येथे वाहतूक कोंडीतूनच वाट काढण्याशिवाय पर्याय नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा