पिंपरी : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून (एमएसआरडीसी) मुंबई मार्गाच्या दिशेने डोंगरगांव, कुसगांव येथे उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या कामामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक वळविल्याने पहिल्याच दिवशी देहूरोडला कोंडी झाली. शेलारवाडी ते देहूरोड पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू होती.

मुंबई-पुणे (यशवंतराव चव्हाण) द्रुतगती मार्गावरील लोणावळा जवळील कुसगाव व डोंगरगाव दरम्यान लोणावळा, पौड पुणे मार्गासाठी उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपूलाच्या ‘गडर’चे काम हाती घेतले आहे. त्यासाठी बुधवारपासून (२२ जानेवारी) ते शुक्रवारपर्यंत (२४ जानेवारी) दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत वाहतूक वळविण्यात येणार आहे. बुधवारी कामाचा पहिलाच दिवस होता. मुंबईकडून पुण्याला जाण्यासाठी वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८) येथून देहूरोडमार्गे पुण्याकडे वाहतूक वळविण्यात आली होती. त्यामुळे दुपारी सोमाटणे पथकर नाका (टोल) येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

हेही वाचा >>>‘बांगलादेशींचे संकट दारापर्यंत’- नागरिकांनी सतर्क रहावे; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

शेलारवाडी येथील अमरजाई देवी मंदिर ते देहूरोडपर्यंत पाच किलोमीटर अंतरावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू होती. सुमारे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच देहूरोड येथील वाहतूक नियंत्रण दिव्याजवळ (सिग्नल) अचानक एक ट्रक बंद पडला. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. वाहनचालकांना चार वेळा वाहतूक नियंत्रण दिवा सुटण्याची प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे काही वाहनचालक विरुद्ध दिशेने जात होते. देहूरोड वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावर बंद पडलेला ट्रक बाजूला घेण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

तीन तास रस्ता बंद केला नव्हता. दीड तासांतच काम संपले. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या तक्रारी आल्या नाहीत. कामशेत, कान्हे फाटा, वडगांव परिसरात वाहतूक कोंडी झाली नाही. पोलीस बंदोबस्त तैनात होता असे महामार्ग पोलिसांनी सांगितले. तर,  देहूरोडला पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. वाहतूक सुरळीतपणे सुरू होती, असा दावा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी केला.

Story img Loader