पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपूल उभारणीचे प्राथमिक काम सुरू झाले असतानाच उड्डाणपुलाची रचना बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यातील मेट्रो मार्गिकेचा विचार करून उड्डाणपुलाबरोबरच मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक खांब उभारण्याची प्रक्रिया महापालिकेकडून हाती घेतली जाणार आहे. यामुळे बहुचर्चित उड्डाणपुलाच्या खर्चात वीस कोटींनी वाढ होणार आहे. मात्र वाढीव खर्च महापालिकेने की महामेट्रोने करायचा, हा तिढा निर्माण झाला असून उड्डाणपुलाचे काम रखडण्याबरोबरच वाहतुकीचाही खेळखंडोबा होणार आहे.

सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यान उड्डाणपूल प्रस्तावित आहे. या उड्डाणपुलाची प्राथमिक कामे दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली. कामे सुरू असतानाच उड्डाणपुलाच्या रचनेत बदल करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. भविष्यातील मेट्रो मार्गिकेचा विचार करून उड्डाणपुलाच्या खांबांबरोबरच मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक खांबांची उभारणी करण्यात यावी, असा हा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीसह महापालिकेच्या मुख्य सभेत मंजूर झाल्याने उड्डाणपुलाच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

 उड्डाणपुलाच्या भूमिपूजनावेळी केंद्रीय भुपृष्ठ आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दुमजली उड्डाणपूल उभारावा, अशी सूचना केली होती. उड्डाणपूल दुमजली करता येईल का, ही चाचपणी करण्यास महापालिका अधिकाऱ्यांनी काही दिवस घेतले. दुमजली उड्डाणपूल उभारणी खर्चिक असल्याचे लक्षात आल्याने हा प्रस्ताव मागे पडला. त्यानंतर उड्डाणपुलाची प्राथमिक कामे सुरू झाली. उड्डाणपुलाची कामे सुरू झालेली असतानाच मेट्रोचे खांब टाकण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे सध्या उड्डाणपुलाचे काम थांबले आहे. मात्र वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. उड्डाणपुलाच्या खांबांबरोबरच मेट्रो मार्गिकेच्या खांबांचा समावेश करण्यात येणार असल्याने उड्डाणपुलाची रचना बदलावी लागण्याची दाट शक्यता असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सिंहगड रस्त्यावरील प्रस्तावित मेट्रो मार्गिकेचा प्राथमिक आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून करण्यात आला आहे. मात्र तो अद्याप महापालिकेला सादर केलेला नाही. प्राथमिक आराखडा सादर झाल्यानंतर महापालिकेची त्याला मंजुरी घ्यावी लागणार आहे. या प्रक्रियेत काही महिने जाण्याची शक्यता आहे. खर्चाचे दायित्व  कोणी घ्यायचे याबाबतही स्पष्टता नाही. मेट्रोच्या रचनेत बदल झाला तर काय होणार, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे उड्डाणपूल अधांतरी आणि वाहतुकीचा खेळखंडोबा असेच चित्र पुढील काही दिवस या रस्त्यावर दिसणार आहे.

संयुक्त बैठक

महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचे या पुलासंदर्भात संयुक्त बैठक सत्र सुरू झाले आहे. मेट्रो आणि उड्डाणपुलाचे खांब एकत्रित उभारण्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. मात्र वाढीव खर्चाचा तिढा कायम आहे. मेट्रोसाठी खांब हे प्रामुख्याने उड्डापूल उतरण्याच्या रॅम्पजवळ येत असून सहा खांब उड्डाणपुलाच्या खांबांजवळ येणार आहेत. मेट्रोचे खांब उभारायचे झाल्यास उड्डाणपुलाचे रॅम्प तोडावे लागण्याची शक्यता आहे. मेट्रोसाठी सुमारे १०३ खांबांची उभारणी करावी लागणार आहे.

तरतूद असली तरी पर्यायी रस्ते मार्गी लागणार का?

सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. पर्यायी रस्ते नसतानाही राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी होणार असल्याने आधी पर्यायी रस्ते मार्गी लावा, असे पोलिसांकडूनही महापालिकेला सांगण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने अंदाजपत्रकात पर्यायी रस्त्यांसाठी भरीव तरतूद केली आहे. मात्र तरतूद झाली तरी पर्यायी रस्ते मार्गी लागणार का, हा प्रश्न कायम आहे.

Story img Loader