पुणे : ‘पुण्यात दहा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मिनिटभराने घट झाली आहे. गेल्या वर्षी शहरात कोंडी होणारी ३७ ठिकाणे होती. वाहतूक पाेलीस आणि महापालिकेने एकत्रित येऊन पुण्यातील वाहतूक गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले. या उपाययोजनांमुळे शहरातील कोंडीची ठिकाणे कमी झाली आहेत,’ असा दावा अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

‘टाॅमटाॅम’ संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सर्वांत मंद वाहतूक होणाऱ्या शहरांत पुण्याचा जगात चौथा क्रमांक असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागतो, या निकषावर ही यादी तयार करण्यात आली आहे. पाटील यांनी त्याचाच आधार घेऊन पुण्यासाठी हा वेळ कमी झाल्याचे सांगितले. ‘सद्यस्थितीत २९ ठिकाणी कोंडी होत असून, भविष्यात कोंडीची ठिकाणे कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,’ असे आश्वासनही त्यांनी दिले. ‘वाहतूक पोलीस आणि महापालिकेने शहरातील १५ प्रमुख रस्त्यांवरील वाहतूकविषयक सुधारणा करण्याचे काम हाती घेतले आहे. चौकातील कोंडीची ठिकाणी, अतिक्रमणे निश्चित करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी रस्ते विषयक सुधारणा केल्या. त्याला महापालिकेने सहकार्य केले. या सुधारणांमुळे कोंडीची ठिकाणे कमी झाली आहेत,’ असे पाटील म्हणाले. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक (नियोजन) सुनील गवळी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पिंपरी : आपत्तीचे संकट रोखण्यासाठी जपानी तंत्रज्ञान

पाटील म्हणाले, ‘खराब रस्ते, खड्ड्यांच्या डागडुजीची कामे हाती घेण्यात आली आहेत. बेशिस्तपणे वाहने लावणे (नो पार्किंग), वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. चौक, तसेच प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे.’

वाहनसंख्येत वाढ; रस्त्यांची क्षमता तेवढीच

‘पुणे आणि पिंपरी -चिंचवड शहरात २०१८ मध्ये ५२ लाख वाहने होती. गेल्या पाच वर्षांत वाहनांची संख्या ७२ लाखांवर पोहोचली. वाहनांची संख्या वाढली असली, तरी रस्त्यांची वाहनक्षमता तेवढीच आहे,’ असे मनोज पाटील यांनी नमूद केले.

Story img Loader