पुणे : पावसाळापूर्व कामे करण्यासाठी महापालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांकडे शहरातील रस्ते काही काळ बंद ठेवण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार, पोलिसांनी ६१ ठिकाणी कामे करण्याची परवानगी दिली असल्याने हे रस्ते अल्प काळासाठी बंद राहणार आहेत. शहरात पावसाळ्यात पाणी साचणारी २०१ ठिकाणे महापालिकेने शोधली आहेत. यंदाच्या पावसाळ्यात तेथे पाणी साचून राहू नये, यासाठी आवश्यक ते नियोजन महापालिकेने केले आहे. या ठिकाणांमध्ये शहरांतील विविध भागांचा समावेश आहे. पुढील एका महिन्यात ही सर्व कामे पूर्ण करणे आवश्यक असल्याने महापालिकेने वाहतूक पोलिसांकडे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी), तसेच ६३ रस्त्यांचा प्रस्ताव पाठवून काम करण्यास मान्यता मागितली होती. त्यांपैकी ६१ ठिकाणी काम करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मान्यता दिल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

पोलिसांनी ‘एनओसी’ दिल्याने लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. गेल्या काही वर्षांत कमी वेळात अधिक पाऊस पडून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. यंदा हे टाळण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेंतर्गत शहरात २३ ठिकाणी पावसाळापूर्व कामे केली जाणार आहेत. त्यासाठी २१ ठिकाणी रस्ते खोदाई करावी लागणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. पोलिसांनी ही कामे करण्यास तत्त्वत: परवानगी दिली आहे.

दोन ठिकाणी खोदाईस नकार

पोलिसांनी सिंहगड रस्त्यावरील रांका ज्वेलर्सजवळ आणि वैभव टॉकीजजवळ खोदाईची परवानगी नाकारली आहे. येथे काम करण्यासाठी परवानगी देताना संबंधित कनिष्ठ अभियंता, काम करणारा ठेकेदार यांचा जबाब घेऊन महापालिकेच्या जबाबदारीवर ही परवानगी देण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.