वाहतूक पोलिसांकडे दाखल; महत्त्वाच्या व्यक्ती, मोर्चा बंदोबस्तासाठी उपयुक्त

पुणे : वाहतूककोंडी झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिसांची गाडी पोहोचू शकत नाही. त्यामुळे वाहनचालकांना वाहतुकीतील बदलांची माहिती देण्यासाठी ध्वनिवर्धक, भोंगा, वाहतूक नियंत्रण करण्यासाठीचे एलईडी बॅटन अशा सुविधा असलेल्या पाच दुचाकी वाहतूक पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तसेच राजकीय नेत्यांच्या बंदोबस्तासाठी लागणाऱ्या ताफ्यातदेखील या दुचाकींचा समावेश केला जाणार आहे.

पोलिसांकडून शहराच्या वेगवेगळय़ा भागांत गस्त घालण्यासाठी दुचाकींचा वापर केला जातो. पोलिसांकडून गस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या दुचाकींपेक्षा वाहतूक पोलिसांना मिळालेल्या दुचाकींची रचना वेगळी आहे. या दुचाकीत ध्वनिवर्धक यंत्रणा (मेगाफोन), भोंगा (सायरन), वाहतूक नियंत्रण करण्यासाठी एलईडी बॅटन अशी सुविधा आहे. त्यामुळे या दुचाकींचा वापर गस्त घालण्यापेक्षा वाहतूक नियंत्रण करण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक (नियोजन) विवेकानंद वाखारे यांनी दिली.

ते म्हणाले, गर्दीच्या रस्त्यावर कोंडी झाल्यानंतर वाहतूक पोलिसांची गाडी तेथे लगेचच पोहोचू शकत नाही. अशा वेळी नवीन दुचाकी ज्या रस्त्यावर कोंडी झाली आहे तेथे लगेचच पोहोचतील आणि कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातील. ध्वनिवर्धक यंत्रणा असल्याने वाहनचालकांना सूचना देणेही शक्य होईल. एलईडी बॅटनचा वापर करून एका बाजूची वाहतूक थांबवणे शक्य होईल. ही दुचाकी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या दुचाकीचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे.

वाहतूक पोलिसांना सुझुकी कंपनीकडून अशा प्रकारच्या पाच दुचाकी नुकत्याच देण्यात आल्या. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते या दुचाकी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आल्या.

पोलिसांच्या नवीन दुचाकीची वैशिष्टय़े

* वाहतूककोंडी झाल्यास उपयुक्त

* ध्वनिवर्धक यंत्रणेद्वारे वाहनचालकांना सूचना

* एलईडी बॅटनद्वारे वाहतूक नियंत्रण

* राजकीय नेते, मोर्चाच्या बंदोबस्तासाठीही वापरणार

* सायरनची सुविधा

Story img Loader