पुणे शहर वाहतूक शाखेकडून संपूर्ण राज्यात वाहतुकीचे नियम सांगणारी ‘विशेष एसएमएस’ योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये नागरिकांना वाहतुकीचे नियम, सुरक्षित वाहतुकीची माहिती देण्यात येत आहे. पुण्यातील बीएसएनएलचे साडेसहा लाख आणि राज्यातील ४४ लाख ग्राहकांना सध्या ही सुविधा दिली जात असून यामध्ये इतर मोबाईल कंपन्यांचा सहभाग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुणे शहर झपाटय़ाने वाढत असून शिक्षणासाठी, आयटी कंपन्यात नोकऱ्यांसाठी बाहेरील राज्यातून पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दररोज पुणे शहरात एक हजार वाहनांची भर पडत आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी सध्या सर्वात मोठी समस्य आहे ती वाहतुकीची. त्यामुळे शहराच्या वाहतुकीचे नियोजन तर सुरुच आहे; पण वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी लोकांची मानसिकता व्हावी. त्यांना वाहतुकीचे नियम माहिती व्हावेत म्हणून रस्ता सुरक्षा सप्ताहाअंतर्गत शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीबाबत जनजागृती करणारी विशेष एसएमएस योजना सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात बीएसएनएल कंपनीशी करार करण्यात आला असून या मोबाईल कंपनीचे पुण्यातील सहा लाख ३५ हजार ग्राहकांना एसएमएसद्वारे वाहतुकीची माहिती दिली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण राज्यातील बीएसएनएलचे ग्राहक असलेल्या ४४ लाख नागरिकांना ही सुविधा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याला नागरिकांकडून प्रतिसाद ही मिळत आहे.
याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले की, वाहतुकीचे नियम, हेल्मेट घालून वाहन चालवावे, मोबाईलवर बोलू नये, वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी अशा प्रकारची माहिती एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. जनजागृतीसाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत १६ प्रकारचे संदेश तयार करण्यात आले आहेत. ते नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. वाहतुकीबद्दल जनजागृती करणाऱ्या एसएमएस योजनेचा नागरिकांना फायदा होणार आहे. या योजनेमध्ये इतर मोबाईल कंपन्यांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याच बरोबर पुणे शहरातील वाहतुकीची कोंडी कोठे झाली, रस्ता कोठे वळविण्यात आला आहे, अशी माहिती देण्यासाठीही बीएसएनएलशी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा