लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : धुळवडीच्या दिवशी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी वेगवेगळ्या भागात नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी केली. या कारवाईत ४०० मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करुन ३८६ वाहने जप्त करण्यात आली. वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी सहा हजार ११८ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करुन ५० लाख ९४ हजारांचा दंड वसूल केला.

धुळवडीच्या दिवशी मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मद्य पिऊन वाहने चालविण्यात आल्याने गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात नाकाबंदी करुन मद्मपी वाहनचालकांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी (१३ मार्च) मध्यरात्रीपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात, तसेच प्रमुख रस्त्यांवर लोखंडी कठडे उभे करुन नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात आली, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

पोलिसांनी ९० ठिकाणी नाकाबंदी करून आठ हजार ५५२ वाहनचालकांची तपासणी केली. ब्रीथ ॲनलायजर यंत्राद्वारे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीत ४०२ वाहनचालकांनी मद्य पिऊन वाहने चालविल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खटले दाखल केले. शहरातील ३७ वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी नाकाबंदी कारवाईत सहभागी झाले होते. वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. भरधाव वेगाने वाहन चालविणे, दुचाकीवरुन ‘ट्रिपल सीट’ प्रवास करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलिासंनी ३८६ वाहने जप्त केली. वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी सहा हजार ११८ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करुन ५० लाख ९४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला, असे पोलीस उपायुक्त झेंडे यांनी सांगितले.

पोलिसांची कारवाई

  • मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई – ४०२
  • दुचाकीवरुन ट्रिपल सीट प्रवास – ९२१
  • विरुद्ध दिशेने वाहन चालविणे – ८५२
  • एकुण कारवाई – सहा हजार ११८
  • दंड – ५० लाख ९४ हजार

९० ठिकाणी नाकाबंदी

होळी, धुळवडीच्या दिवशी वाहनचालक मद्य पिऊन वाहने चालवितात. भरधाव वाहन चालविण्यात येत असल्याने गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. अपघाताच्या घटना रोखणे, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी ९० ठिकाणी नाकाबंदी करुन मद्यपी वाहनचालक, तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली, असे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.

Story img Loader