पिंपरी: जप्त केलेली दुचाकी परत देण्यासाठी वाहन चालकाकडे १० हजार रूपये लाच मागितल्याप्रकरणी चाकण येथील वाहतूक पोलीस व त्याचा सहायक (वॉर्डन) अशा दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.
हेही वाचा : माळेगांव नगरपंचायतीवर कमळ फुलवा; ‘मिशन बारामती’ची सुरुवात माळेगांव नगरपंचायतीपासून
आप्पासाहेब अंबादास जायभाय (वय ३२, पोलीस कॉन्स्टेबल, चाकण वाहतूक विभाग) आणि किशोर भगवान चौगुले (वय ४३. वाहतूक नियमनासाठी नेमलेला खाजगी मदतनीस (वॉर्डन ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी २२ वर्षीय युवकाने या विभागाकडे तक्रार केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण वाहतूक विभागाने तक्रारदारांची दुचाकी ताब्यात घेतली होती. कोणतीही कारवाई न करता ती दुचाकी परत देण्यासाठी आरोपी जायभाय याने १० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती सात हजार रुपये लाच स्वीकारली. या कामासाठी वॉर्डनने सहाय्य केले. सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त शीतल घोगरे करत आहेत.