सकल हिंदू समाजाकडून रविवारी (२२ जानेवारी) काढण्यात येणाऱ्या हिंदू जनआक्रोश मोर्चानिमित्त मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या मोर्चात अंदाजे दहा हजार जण सहभागी होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून मध्यभागात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोर्चाची सुरुवात सकाळी दहाच्या सुमारास कसबा पेठेतील लाल महाल चौकातून होणार आहे. शिवाजी रस्ता, बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, संभाजी पूल या मार्गाने मोर्चा जाणार असून डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौक येथे मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चात अंदाजे दहा हजार जण सहभागी होण्याची शक्यता असून मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

हेही वाचा >>> पुणे : शाळेतील विद्यार्थिनींची फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

मोर्चाची सुरुवात झाल्यानंतर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे – गाडगीळ पुतळ्याकडून जिजामाता चौकाकडे जाणारी वाहने मोर्चा बेलबाग चौकातून मार्गस्थ होईपर्यंत डावीकडे वळून कुंभार वेस चौकमार्गे इच्छितस्थळी जातील. सोन्या मारुती चौकातून लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकाकडे जाणारी वाहने फडके हौद चौकमार्गे इच्छितस्थळी जातील. लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौकमार्गे टिळक चौकाकडे जाणारी वाहने मोर्चा खंडोजीबाबा चौकात पाेहोचेपर्यंत सेवासदन चौकातून बाजीराव रस्त्याने अप्पा बळवंत चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.

हेही वाचा >>> पुणे : थंडीचा जोर ओसरणार; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

मोर्चा बेलबाग चौकात आल्यानंतर बाजीराव रस्त्याने येणारी वाहने पूरम चाैकातून टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जातील. मोर्चा टिळक चौकात आल्यानंतर शास्त्री रस्त्याने येणारी वाहने सेनादत्त चौकातून म्हात्रे पूलमार्गे इच्छितस्थळी जातील.

डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल

मोर्चा डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर अलका चित्रपटगृह चौकाकडून येणारी वाहने कर्वे रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे. भांडारकर रस्त्याने येणारी वाहने प्रयाग हाॅस्पिटलकडे न सोडता फर्ग्युसन रस्त्यावर वळविण्यात येणार आहे. कोथरूडकडून येणारी वाहतूक रसशाळा चौकातून उजवीकडे वळवून एस. एम. जोशी पुलाकडे वळविण्यात येणार आहे. महापालिकेकडून येणाऱ्या वाहनांना बालगंधर्व चौकाकडे जाण्यास मनाई करण्यात येणार आहे. मोर्चा अलका चित्रपटगृहाजवळ आल्यानंतर जंगली महाराज रस्त्याने येणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic route change for central region of pune for hindu jan akrosh morcha pune print news rbk 25 zws