बेशिस्त वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे शहरात वर्षभरापूर्वी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. प्राथमिक स्वरुपात होत असलेल्या या कारवाईचा वेग आता वाढविण्यात येणार असून गेल्या काही दिवसांपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली ही कारवाई पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून व्यापक प्रमाणावर हाती घेण्यात आली आहे. बेशिस्त वाहनचालकांची नियमभंगाची छायाचित्रे चौकांमधील सीसीटीव्ही कॅमेरे टिपणार असून टिपलेल्या छायाचित्राची प्रत व दंडाची पावती आंतरदेशीय पत्राद्वारे वाहनचालकांना घरपोच पाठवली जाणार आहे. हे पत्र मिळाल्यानंतर सात दिवसात दंड न भरल्यास मोटार वाहन न्यायालयात खटले दाखल करण्यात येतील.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक हजार २३६ कॅमेरे बसविण्यात आले. प्रमुख चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांची छायाचित्रे टिपली जातात. त्यानंतर वाहन क्रमांकावरुन वाहतूक शाखेक डे असलेल्या संगणकीय प्रणालीचा वापर करुन वाहनचालकांचे नाव आणि पत्ता मिळविला जातो. संबंधित वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे पत्र, तसेच तडजोड शुल्क (दंडाची रक्कम), नियमाचे उल्लंघन कशा प्रकारे केले त्याची छायाचित्रे आंतरदेशीय पत्राद्वारे वाहनचालकाला पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी ही कारवाई प्रायोगिक तत्त्वावर केली जात होती. मात्र, मंगळावारपासून ही कारवाई व्यापक प्रमाणावर करण्यास सुरुवात झाली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी या योजनेची माहिती दिली. या वेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक (खटला विभाग) बाळकृष्ण अंबुरे हेही उपस्थित होते.

वाहनचालक ज्या भागात रहायला असेल त्या भागातील वाहतूक पोलीस विभागात त्याने पत्र सादर करुन दंडाची रक्कम भरणे अपेक्षित आहे. पत्र घरपोच मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत दंड भरणे अपेक्षित आहे. जे वाहनचालक दंडाची रक्कम भरणार नाहीत त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार आहेत.

हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांवर लक्ष

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक चौकात पोलीस नेमण्यात आले आहेत. त्याबरोबरच ज्या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत अशा चौकांत नियम धुडकाविणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्राद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. प्रमुख चौकात पादचारी मार्गावर वाहने लावणे (झेब्रा क्रॉसिंग), हेल्मेटचा वापर न करणे, मोटार चालविताना आसन पट्टा न लावणे (सीटबेल्ट), मोबाईलवर संभाषण करत वाहन चालविणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे (रॅश ड्रायव्हिंग) आदी प्रकारांबाबत कारवाई केली जाईल.

दंडाची नवीन तरतूद

* हेल्मेट न वापरणे- ५०० रुपये

*  सीटबेल्ट न लावणे- २०० रुपये

*  सिग्नल तोडणे- २०० रुपये

*  वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण- २०० रुपये

*  पादचारी मार्गावर वाहन लावणे- २०० रुपये

*  भरधाव वाहन चालविणे- २०० रुपये

पहिल्या दिवशी शंभर जणांवर कारवाई

वाहतुकीचे नियम धुडकाविणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत शंभर वाहनचालकांवर कारवाई क रण्यात आली. समजा एखादा वाहनचालक परगावचा असेल तर त्याच्या पत्त्याची शहानिशा केल्यानंतर त्याच्या मूळ पत्त्यावर पत्र पोच होईल. समजा एखाद्याने टाळाटाळ केली तर पोलिस वाहनचालकाच्या घरी जाऊन शहानिशा करतील.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic rules breakers get fine receipt at home