पिंपरी ते नाशिक फाटय़ापर्यंत वाहतुकीचा खोळंबा; वाहनचालकांना त्रास

मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील काम पिंपरीत अतिशय वेगाने सुरू आहे. मात्र, या कामात नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याने व रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असल्याने पिंपरी ते नाशिक फाटा या तीन किलोमीटर अंतरावरील वाहतूक खूपच मंदावली आहे. त्याचा त्रास वाहनचालकांना दररोज सहन करावा लागतो आहे.

स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामाने बराच वेग घेतला आहे. अद्ययावत मशिनरी व कामगारांची दिवसभर लगबग दिसून येत आहे. पिंपरीतील काम सुरू करताना मेट्रो व महापालिकेच्या वतीने काही प्रमाणात नियोजन करण्यात आले होते. तथापि, प्रत्यक्षात त्याची कार्यवाही होत नसल्याने वाहतुकीच्या बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सकाळी नऊ ते अकरा या वेळात व सायंकाळी साडेपाचनंतर वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणारे नागरिक हैराण झाले आहे. पिंपरी-चिंचवडच्या ग्रेडसेपरेटरमधून वेगाने जाता येते, अशा भावनेने येणाऱ्या नागरिकांचा सध्या तरी अपेक्षाभंग होतो आहे.

मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी होणार, हे गृहीत धरण्यात आले होते. पर्याय म्हणून बीआरटीचा मार्ग दुचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, निगडी ते दापोडी दरम्यानच्या बीआरटी मार्गावर वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे आहेत. कुठे खासगी वाहने लावण्यात आलेली आहेत. तर, काही ठिकाणी खड्डे आहेत. त्यामध्ये पाणी साचलेले असते. मेट्रोच्या कामातील अवजड साहित्य ठेवण्यासाठी बीआरटी मार्गाचा वापर करण्यात येतो आहे. आता मेट्रोचे काम पिंपरीतील मुख्य चौकात सुरू झालेले आहे. त्या ठिकाणी आधीपासून वाहतुकीच्या कोंडीची समस्या आहे. आता ती समस्या आणखी जटील झाली आहे. त्या ठिकाणी रिक्षाचालकांची मुजोरी कायम आहे. त्या विषयी कोणतीही तजवीज करण्यात आलेली नाही. रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावलेली असतात, हातगाडय़ा तसेच अन्य अतिक्रमणे आहेतच, त्याकडे लक्ष दिले जात नाही. नागरिकांना दररोज भेडसावणारी समस्या सोडवण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांना संयुक्तपणे प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण, वाहतुकीचा खोळंबा या दोघांमध्ये समन्वय नसल्याने होतो आहे.

Story img Loader