पुणे : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागात घडली. रोहित सुभाष मंडाळकर (वय १२, रा. महापालिका शाळेसमोर, डीपी रस्ता, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. शहर परिसरात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.
रोहित सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हडपसर परिसरातील डीपी रस्त्याने निघाला होता. हँडबॉल स्टेडियमसमोर साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरला होता. तेथून निघालेल्या रोहितला विजेचा धक्का बसला. रोहित जागेवर बेशुद्ध पडला. बेशुद्धावस्थेतील रोहितला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा…निवडणुकीच्या तोंडावर रिक्षाचालकांचा जाहीरनामा! उमेदवारांकडे केल्या या प्रमुख मागण्या…
या घटनेची माहिती हडपसर पोलिसांना कळविण्यात आली. रोहितच्या मृत्युमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. शवविच्छेदनानंतर मृत्यूमागचे निश्चित कारण समजेल. प्राथमिक चौकशीत साचलेल्या पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. पाण्यात पडल्याने त्याच्या नाका तोंडात पाणी गेले होते, असे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.