पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नगर रस्त्यावरील वाघोली भागातील एका कंपनीच्या आवारात सुरक्षारक्षक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी समाजमाध्यमात व्यक्त होऊन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे सांगितले. मनोज जरांगे यांच्या नावाने त्याने चिठ्ठी लिहिली. आरक्षण मिळाले पाहिजे, असा मजकूर तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत होता.
प्रसाद देठे (रा. वाघोली, मूळ रा. बार्शी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. देठे मूळचे बार्शी तालुक्यातील रहिवासी आहेत. काही वर्षांपूर्वी ते कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाले होते. वाघोली भागातील एका खासगी कंपनीत ते सुरक्षारक्षक होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. मुलगा द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे. दोन्ही मुली शिक्षण घेत आहे. मंगळवारी (१८ जून) ते कामावरून घरी आले. त्यानंतर देठे समाजमाध्यमात व्यक्त झाले. मराठा समाजातील तरुणांच्या व्यथा, बेरोजगारी, तसेच अन्य समस्यांविषयी त्यांनी समाजमाध्यमात व्यथा मांडली. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या आवारातील टेम्पोच्या लोखंडी गजाला डोक्याला गुंडाळण्याचे कापड (गमछा) बांधून गळफास घेतला.
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काय ?
आत्महत्या करण्यापूर्वी प्रसाद देठे यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘जयोस्तू मराठा. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाले पाहिजे. पंकजा ताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, मुंढे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. मी स्वखुशीने आत्महत्या करत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. माझे तुम्हाला पटणार नाही. मी पूर्ण हताश झालोय. मला माफ करा’, असे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
© The Indian Express (P) Ltd