लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : उरुळी कांचन येथे लोहमार्गावर गॅस सिलिंडर ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. रेल्वेचालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर रेल्वे सुरक्षा दलातील फौजदार शरद शहाजी वाळके (वय ३८, रा. सार्थक रेसिडेन्सी, केसनंद रोड, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. उरुळीकांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रविवारी (२९ डिसेंबर) रात्री पावणेअकराच्या सुमारास सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस पुण्याकडे येत होती. उरुळी कांचन रेल्वे स्टेशन येथे पुण्याकडे जाणाऱ्या मुख्य लोहमार्गावर मालगाडी उभी असल्याने ही गाडी बाजूच्या लोहमार्गावर वळविण्यात आली.
आणखी वाचा-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया… झाले काय?
मालगाडी गेल्यानंतर ही गाडी पुन्हा मुख्य लोहमार्गावर घेऊन पुण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. उरुळी कांचन गावाच्या हद्दीत असलेल्या एका रेल्वे विद्युत खांबाजवळ घरगुती गॅस सिलिंडर ठेवण्यात आला होता. रेल्वे गाडीचालक आर. टी. वाणी यांना लाल रंगाची मोठी वस्तू असल्याचे दिसून आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ गाडीचा वेग कमी केला. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर फौजदार वाळके हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सिलिंडर बाजूला केला.’
फौजदार वाळके यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यानंतर सिलिंडर रेल्वे सुरक्षा विभागाच्या ताब्यात दिला. घातपात घडवून आणण्याच्या दृष्टीने लोहमार्गावर सिलिंडर ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाजगिरे करीत आहेत.