पुणे : रेल्वेतील आसनाच्या आरक्षणासंर्दभात बनावट संदेश तयार करून तोतया तपासणीसाद्वारे प्रवाशांना गंडा घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या तोतया तपासनीसाला पुणे रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) पथकाने मोठ्या शिताफीने पकडले आहे. अधिक तपासासाठी आरोपीला स्थानिक लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान, रेल्वे विभागाने प्रवाशांसाठी आसन आरक्षण सुविधा तसेच रेल्वे विभागाची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. या शिवाय कोणत्याही व्यक्तीकडून आसन क्रमांक आरक्षित करून घेऊ नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा

रेल्वे प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, प्रवीणकुमार लोंढे (रा. सांगली) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना आरक्षण मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन, मोबाइलद्वारे खोटे संदेश प्रसारित करून प्रवाशांकडून पैसे उकळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार रेल्वे पोलीस दलाकडून विशेष पथक स्थापन करून शोधमोहीम सुरू करण्यात आली. २३ डिसेंबर रोजी झेलम एक्सप्रेसजवळ संबंधित प्रवाशाच्या मोबाइलवर आसन आरक्षणासंर्दभात संदेश पाठविण्यात आला असून त्याला बनावट तिकीट पाठविण्यात आले. या संदेशात डब्याचे आरक्षण, आसन क्रमांक आणि अतिरिक्त सेवा शुल्क आदी माहिती देऊन प्रवाशांकडून २ हजार रुपये आकारले जात होते. २३ डिसेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानकावर अशाच प्रकारे एका प्रवाशाला संदेश पाठवून गंडा घालत असताना मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून आरोपी लोंढे याला पकडण्यात आले.

हेही वाचा – “बारणेंनी काळजी करू नये, देवेंद्र फडणवीस हे…”, भाजपच्या आमदाराचे शिवसेनेच्या खासदारांना प्रत्युत्तर

आरोपी लोंढे याचा मोबाइल तपासला असता, मोबाइलमध्ये बनावट संदेश असल्याचे तपासात समोर आले. यावेळी अधिक विचारपूस केली असता आरोपीने रेल्वे अधिकाऱ्याचा वेश धारण करून प्रवाशांना फसवण्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपीला अधिक तपासासाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपी लोंढेच्या संपर्कात आणखी किती व्यक्ती आहेत, याचा देखील तपास करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Story img Loader