पिंपरी : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून देखील २०२२ मध्ये अपंगत्वाचेे प्रमाणपत्र घेतल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित प्रमाणपत्राची नोंद या रुग्णालयात असल्याचे आढळून आले आहे.
हेही वाचा >>> दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा उद्यापासून; विद्यार्थी नोंदणीमध्ये यंदा घट
पूजा खेडकर या विविध कारणांनी चर्चेत आहेत. खेडकर यांच्या प्रमाणपत्राबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आहे. त्यातील दिव्यांग प्रमाणपत्र नगरमधील सरकारी रुग्णालयातून देण्यात आले आहे. २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग आणि २०२० मध्ये मनोविकार प्रमाणपत्र देण्यात आले. या दोन्हींचे एकत्रित प्रमाणपत्र सन २०२१ मध्ये देण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून देखील खेडकर यांनी अपंगत्वाचेे प्रमाणपत्र घेतल्याचे निदर्शनास आले आहे. २०२२ मध्ये हे प्रमाणपत्र दिल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले की, खेडकर यांना २०२२ मध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. कोणत्या निकषांवर हे प्रमाणपत्र दिले होते, त्याची पडताळणी करण्यात येत आहे.