Pooja Khedkar Update पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांची नोटीस मिळताच त्यांच्या बाणेर येथील बंगल्यातून आलिशान मोटार गायब करण्यात आली आहे.  त्याखेरीज बंगल्यात असलेली दुसरी आलिशान मोटारही खेडकर यांनी हलवली आहे.

बाणेर येथील बंगल्यात गुरुवारी ही आलिशान मोटार झाकून ठेवण्यात आली होती. पुणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर शुक्रवारी ही मोटार बंगल्यातून हलवण्यात आली आहे. याच मोटारीवर अंबर दिवा लावून पूजा खेडकर जिल्हाधिकारी कार्यालयात जात होत्या. त्याखेरीज बंगल्यात असलेली दुसरी मोटारही खेडकर यांनी बंगल्यातून हलवली आहे.

हेही वाचा…पुण्यात ४९ शाळा अनधिकृत… शिक्षण विभागाकडून यादी जाहीर…

परिविक्षाधीन अधिकारी असताना स्वतःच्या मोटारीवर अंबर दिवा लावल्याप्रकरणी पूजा खेडकर या चर्चेत आल्या होत्या. अशा प्रकारचा दिवा कोणत्याही अधिकाऱ्याच्या गाडीवर लावण्यात येऊ नये अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या असतानाही पूजा खेडकर यांनी ती गोष्ट केली. त्यामुळे त्यांची मोटारही चर्चेत आली. पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्या मोटारीवर कारवाई करण्यास गेले होते. मात्र, त्यांच्या आईने पोलिसांनाच दमदाटी करत बंगल्याच्या प्रवेशद्वाराबाहेरच उभे केले. त्यानंतर शुक्रवारी ही मोटार बंगल्यातून गायब करण्यात आली आहे.

हेही वाचा…माओवादी संजय राव याला ‘एटीएस’कडून अटक, शहरी भागात माओवादी विचारधारेचा प्रसार केल्याचा आरोप

पूजा खेडकर वापरत असलेली ही मोटार थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. या कंपनीचा मूळ मालक हा पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांचा माजी सहकारी आहे. मोटारीच्या मूळ मालकाची माहिती समोर आल्यानंतर पोलीस त्यांना नोटीस बजावण्याची कारवाई करण्याची शक्यता आहे.