पुणे : अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रशिक्षणार्थी वैमानिक तरुणीला डॉक्टरांनी मेंदुमृत घोषित केले. त्यानंतर तिच्या पालकांनी अवयदानाचा निर्णय घेतल्याने सहा जणांना जीवदान मिळू शकले आहे. या तरुणीच्या पाच अवयवांचे सहा जणांवर प्रत्यारोपण करण्यात आले आहे. या सहाही जणांची प्रकृती आता सुधारत आहे.

राजस्थानमधील जयपूर येथील रहिवासी असलेली २० वर्षीय तरुणी पुणे जिल्ह्यातील एका वैमानिक प्रशिक्षण संस्थेत होती. तिचा ९ डिसेंबरला रस्ता अपघात झाला होता. त्यात गंभीर जखमी झाल्याने तिला रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. तिच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. नंतर तिची प्रकृती आणखी बिघडली. डॉक्टरांनी तिला मेंदुमृत घोषित केले. तिच्या मृत्यूनंतर पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. रुबी हॉल क्लिनिकने विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीशी समन्वय साधला. समितीच्या नियमानुसार आणि देखरेखीखाली या तरुणीच्या अवयवांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रसाद मुगळीकर यांनी दिली.

हेही वाचा – पुणे : पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, वसूल केला इतक्या हजारांचा दंड !

मृत तरुणीचे हृदय आणि एक मूत्रपिंड रुबीमधील दोन रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आले. याच वेळी तिचे यकृत विभागून रुबीमधील दोन रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आले. तरुणीचे स्वादुपिंड आणि एक मूत्रपिंड डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील दोन रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आले. अशा पद्धतीने तरुणीच्या अवयवदानामुळे सहा जणांना जीवदान मिळाले आहे. या सहा जणांची प्रकृती आता सुधारत आहे, अशी माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने दिली.

हेही वाचा – शाळकरी मुलांवर अत्याचार प्रकरणात संस्थाचालक अटकेत

पुणे विभागीय प्रत्यारोपण समितीने वर्षभरात ६७ जणांच्या अवयवदानाची प्रक्रिया पार पाडली आहे. या तरुणीच्या पालकांनी अतिशय कठीण प्रसंगात नि:स्वार्थीपणे निर्णय घेऊन अवयवदानास संमती दिली. त्यामुळे इतरांना जीवदान मिळाले आहे. – आरती गोखले, सचिव, विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती, पुणे

Story img Loader