पुणे : पवित्र प्रणालीमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण ४ ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. मात्र ऐन दिवाळीच्या सुटीत प्रशिक्षण होत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, प्रशिक्षणाचा कालावधी बदलण्याची मागणी करण्यात येत आहे.
शिक्षण विभागाने पवित्र प्रणालीच्या माध्यमातून राबवलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये राज्यभरात सुमारे १७ हजारांहून अधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील तरतुदीनुसार नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रम राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात आले आहे. त्यात पहिली ते आठवी, नववी ते बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी समान असलेल्या घटकांबाबतचे प्रशिक्षण एकत्रित घेतले जाणार आहे. तर सातवा दिवस स्वतंत्र घटकांसाठी असणार आहे. हे प्रशिक्षण प्रत्यक्ष पद्धतीने (ऑफलाइन) होणार आहे. तसेच राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील नवनियुक्त शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा – पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनला भीषण आग; सहा बंब घटनास्थळी दाखल
जिल्ह्यातील १०० टक्के नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची असणार आहे. प्रशिक्षणासाठीच्या मार्गदर्शक पुस्तिका राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेला उपलब्ध करून देण्यात येतील, असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, एससईआरटीने आयोजित केलेला प्रशिक्षणाचा कालावधी अडचणीचा ठरत आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबरला टीईटी परीक्षा होणार आहे. नवनियुक्त शिक्षकांपैकी अनेकांनी या परीक्षेचा अर्ज भरला आहे. अनेक वर्षे प्रतीक्षा करून नोकरी लागल्याने अनेकांनी सुट्टीच्या काळात लग्न कार्य ठरवले आहे. निवडणूक आयोगाचे प्रशिक्षणही १० नोव्हेंबरलाच होणार आहे. नवनियुक्त शिक्षकांपैकी अनेकांना केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे काम देण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेता एससीईआरटीने प्रशिक्षण पुढे ढकलून निवडणूक झाल्यानंतर आयोजित करावे, अशी मागणी डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी केली.