पुणे: मुसळधार पावसामुळे बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान लोहमार्ग बुधवारी पाण्याखाली गेले. यामुळे पुणे – मुंबई दरम्यानच्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस आणि इंद्रायणी एक्स्प्रेस गुरूवारी (ता.२०) रद्द करण्यात आल्या आहेत.
पावसामुळे बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यान लोहमार्ग पाण्याखाली गेल्याने आज सकाळपासून रेल्वे वाहतूक विस्कळीत विस्कळीत झाली. आज मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस आणि पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. उद्याही (गुरूवार) या गाड्या रद्द असणार आहेत. आज कल्याणमार्गे जाणाऱ्या गाड्या प्रामुख्याने विस्कळीत झाल्या. त्यामुळे काही गाड्या पनवेलमार्गे पुढे रवाना झाल्या.
याचबरोबर कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस ही गाडी पुण्यापर्यंत धावली. ती पुढे मुंबईकडे रवाना झाली नाही. मुंबई-गदग एक्स्प्रेस गाडी पुण्यातून गदगला रवाना झाली. दौंड-इंदोर एक्स्प्रेसचा मार्ग बदलून ती दौंड-मनमाड-जळगाव-सुरतमार्गे रवाना झाली. बदलापूर- अंबरनाथ दरम्यान लोहमार्गावरील पाणी ओसरत असून, रात्री उशिरा रेल्वे सेवा सुरळीत होईल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी रामदास भिसे यांनी दिली.
२० जुलैला रद्द गाड्या
-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन
-पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
-मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
-मुंबई -पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
-मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस