एक मोठा प्रकल्प उभारण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळावे म्हणून एका शिपायाच्या मदतीने पुण्यातील फग्र्युसन रस्त्यावरील सारस्वत बँकेत आठ बनावट चालू खाती उघडून त्याद्वारे १६१ कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. ही खाती उघडण्यास बँकेतील महिला अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी शिपायाला अटक केली आहे.
विनोद आनंद सासणे (वय ३६, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बँकेच्या वतीने सुभाष रामचंद्र पाडगांवकर (वय ४८, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासणे हा कोल्हापूर येथील एम. एल. जी. हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून काम करतो. ही शाळा जोगेश्वरी ब्रेव्हरीज प्रा. लि. कंपनीचे संचालक उमेश धोंडिराम शिंदे अध्यक्ष असलेल्या विद्यापीठ सोसायटीची आहे. शिंदे यांना उस्मानाबाद जिल्ह्य़ातील उमरगा येथे एक प्रकल्प उभारायचा होता. त्यासाठी बँकेकडून कर्ज मिळावे म्हणून त्यांनी सासणे आणि त्याच बँकेतील महिला अधिकाऱ्याच्या मदतीने आठ बनावट चालू खाती उघडली. त्यावरून १६१ कोटींचा व्यवहार झाला आहे. फग्र्युसन रस्त्यावरील सारस्वत बँकेच्या शाखेत कोथरुड येथील वैदिक अॅग्रो सोल्युशन्स प्रा. लि. आणि श्री समर्थ इंडस्ट्रीज भोसरी या दोन कंपन्यांच्या नावाने डिसेंबर २००९ मध्ये बनावट चालू खाती उघडण्यात आली. ही खाती उघडण्यासाठी सासणे याने ओळख दिली आहे. यातील समर्थ इंडस्ट्रीजचे खाते उघडताना बनावट फोटो आणि खोटी सही करण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्याच बरोबर बँकेने फिर्याद दिलेल्या दोन खात्यांबरोबरच आणखी सहा खाती बनावट असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या सर्व खातेदारांना सासणे ओळखत असून त्यानेच सर्वाना ओळख म्हणून सह्य़ा केल्या आहेत. या गुन्ह्य़ाच्या मुख्य सूत्रधाराचा डेक्कन पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा