रक्तचंदनाचा साठा, इस्पात कंपनी दरोडाप्रकरण आणि पत्नीच्या नावावर घेतलेला फ्लॅट या तीन प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) चे निरीक्षक नितीनकुमार गोकावे आणि आर्थिक शाखेचे निरीक्षक बलराज लांजिले या दोन महत्त्वाच्या विभागाच्या निरीक्षकांची ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी बदली केली आहे. एका फौजदारासह पाच कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे.
चाकण पोलिसांनी जानेवारी महिन्यात रक्तचंदनाचे साठे पकडले होते. या साठय़ांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्याचेच संरक्षण असल्याचे अपर पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी केलेल्या चौकशीत समोर आले. त्याच बरोबर एका आरोपीला लोणावळा येथे नजरकैद करून लोखो रुपये वसूल केल्याचे आढळून आले आहे. चौकशीत या कर्मचारी व अधिकाऱ्यांविरुद्ध तांत्रिक पुरावे मिळाले आहेत. त्यानुसार कर्मचारी श्रीकांत माळी, पप्पू हिंगे आणि विक्रम पाषाणकर यांना निलंबित केले आहे.
शिक्रापूर येथील इस्पात कंपनीवर दरोडाप्रकरणात फौजदार व पोलीस कर्मचारी हे दरोडेखोरांशी फोनवरून संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. दरोडय़ाच्या दिवशी आरोपींशी वीस वेळा फौजदाराने संपर्क साधल्याचे चौकशीत समोर आले. या प्रकरणात फौजदार संग्राम पाटील, कर्मचारी तात्या खाडे या दोघांना निलंबित केले आहे. चाकण येथे पत्नीच्या नावावर असलेला फ्लॅट विकसित करताना वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आर्थिक शाखेचे पोलीस निरीक्षक लांजिले यांचीही अधीक्षकांनी नियंत्रण कक्षामध्ये बदली केली आहे. त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांची ही बदली करण्यात आली आहे. तर गोकावे यांची वाहतूक शाखेत बदली केली असून या दोघांची विभागीय चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transfer of 2 police inspector including police officer 5 others suspended
Show comments