पिंपरी पालिकेच्या आयुक्तपदावरून डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली राष्ट्रवादीच्या प्रचंड दबावामुळेच केली होती, असा खुलासा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. शासनाच्या अन्य विभागाला चांगले अधिकारी मिळावेत म्हणून परदेशींची बदली केल्याचा युक्तिवाद माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी केला होता. तथापि, चव्हाणांच्या या विधानामुळे अजितदादांचे पितळ उघडे पडले आहे.
नियमाच्या आधारे काम करणारे डॉ. परदेशी राष्ट्रवादीच्या दृष्टीने प्रचंड डोकेदुखी ठरले होते. िपपरीतील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी तगादा लावल्यानंतर अजितदादांनी त्यांच्या बदलीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडे दबाव टाकला होता. त्यानुसार, चव्हाणांनी परदेशींची बदलीही केली होती. मात्र, शासनाला अशा चांगल्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचे सांगत भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या मुद्रांक शुल्क विभागात परदेशी यांची आवश्यकता असल्याचे अजितदादांनी तेव्हा सांगितले होते. हाच सूर त्यांनी नंतरच्या काळातही सातत्याने आळवला होता. मात्र, चव्हाणांनी नुकतेच एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यातील सत्य सांगून टाकले. ते म्हणाले,‘ पिंपरीतील अनधिकृत बांधकामांचे प्रकरण न्यायालयात होते. सुनावणीच्या वेळी आयुक्तांना बोलावले जायचे आणि ती बांधकामे का पाडली जात नाहीत, याविषयी विचारणा व्हायची. वेळोवेळी त्यांची कानउघडणी होत होती. बांधकामे पाडण्याची कारवाई न केल्यास आयुक्तांवरच कारवाई करू, असा इशारा दिला जात होता. वरच्या न्यायालयात जाऊन दाद मागणे, स्थगिती मिळवणे अपेक्षित होते, तसे काही झाले नाही. त्यामुळे आयुक्तांनी कारवाईला सुरूवात केली. जवळपास २५० इमारती त्यांनी पाडल्या. त्यानंतर, आयुक्तांवर दबाव येऊ लागला. अशाप्रकारे कारवाई सुरू राहिल्यास आपल्या मतांवर परिणाम होईल, असे आपल्यालाही सांगण्यात येऊ लागले. आयुक्तांची बदली न झाल्यास पक्षावर परिणाम होईल म्हणून आपल्यावर राष्ट्रवादीचा प्रचंड दबाव आला. त्यामुळेच आपल्याला त्यांची इतरत्र बदली करावी लागली.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा