लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्यास अखेर सुरुवात झाली. शासनाने सुरुवातीस उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाने मंगळवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश प्रसृत केले. यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मिनल कळसकर यांची नियुक्ती झाली आहे, तर शहर अन्नधान्य वितरण अधिकारीपदी दादासाहेब गिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारामती प्रांताधिकारी म्हणून वैभव नावडकर, दौंड-पुरंदर प्रांताधिकारीपदी मिनाज मुल्ला, नोंदणी उपनिरीक्षक (संगणक) म्हणून अभिषेक देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे आदेश महसूल विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी प्रसृत केले.
आणखी वाचा- पिंपरी: नालेसफाईकडे लक्ष्य वेधण्यासाठी चक्क नाल्यात बसून उपोषण
आधी करोनाची परिस्थिती आणि गेल्या वर्षी मुख्यमंत्री यांनी बदल्यांना दिलेली स्थगिती यादरम्यान राज्यात झालेले सत्तांतर यामुळे बदलीस पात्र असलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. अखेर आता महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्यास सुरुवात झाली. गेल्या दोन वर्षात बदल्या न झाल्याने तसेच पुढील वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे असल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
…अखेर पूर्णवेळ अधिकारी मिळाला
उपजिल्हा निवडणूक अधिकारी हे पद देखील गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होते. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे आहे. या पदावर नागपूर येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांची पुणे जिल्ह्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. कीर्ती नलावडे यांची नियुक्ती पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त या पदावर झाली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले पुणे शहरचे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांची सोलापूर येथे भूसंपादन अधिकारी या पदावर नियुक्ती केली आहे. तसेच शहरातील अन्नधान्य वितरण अधिकारी हे पद गेल्या एक वर्षांपासून रिक्त होते. शहरातील गरजू नागरिकांना रास्त भाव धान्य दुकानांमधून सवलतीच्या तसेच विनामूल्य धान्य वितरण करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असते. मात्र, गेल्या एक वर्षांपासून या पदाचा पदभार इतर अधिकाऱ्यांकडे देण्यात आला होता.