राष्ट्रीय नदी सुधार प्रकल्पाला (जायका प्रकल्प) गती देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रकल्प अंमलबजावणी कक्षातील अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधीच विविध कारणांनी रखडलेली ही योजना पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शहरातील नद्यांतून थेट नदीपात्रात सांडपाणी मिसळत असल्याने नद्यांचे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेने राष्ट्रीय नदी सुधार योजना हाती घेतली असून त्याला जपानस्थित जायका कंपनीकडून वित्तीय साहाय्य मंजूर झाले आहे.
या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जायका कंपनीबरोबर करार केला असून ८४१ कोटी रुपये अनुदान स्वरूपात केंद्र सरकारकडून महापालिकेला प्राप्त होणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत नव्याने अकरा ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि ५६ किलोमीटर लांबीच्या सांडपाणी वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने ‘प्रकल्प अंमलबजावणी कक्ष’ स्थापन केला आहे. या कक्षात तीसहून अधिक अभियंत्यांचा समावेश करण्यात आला असून त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.कक्षातील अभियंत्यांची बदली करू नये आणि काही कारणास्तव बदली करायची झाल्यास आयुक्तांची मान्यता घ्यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत.
हेही वाचा:पुणे: शनिवारवाडा परिसरातील दर्गा हटविण्याची हिंदू महासंघाकडून मागणी
मात्र त्यानंतरही अधिकाऱ्यांची बदली सुरू करण्यात आली आहे. सध्या या प्रकल्पाचे मलवाहिनी टाकण्याच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे, तर नायडू, भैरोबा आणि धानोरी येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. उर्वरित ठिकाणचे कामाचे अंतिम आराखडे मंजूर झालेले आहेत. मात्र अभियंत्यांच्या बदल्यांमुळे प्रकल्पावर त्याचा परिणाम होऊन तो आता रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.