लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही सहसंचालकांचा कार्यभार संपुष्टात आणण्यात आला असून, पुणे विभागाच्या सहसंचालकपदी डॉ. केशव तुपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उच्च शिक्षण सहसंचालकांच्या बदल्यांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. पुणे विभागाचे सहसंचालक किरणकुमार बोंदर यांची बदली नांदेड विभागीय सहसंचालक पदी करण्यात आली आहे. तर पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकपदी मुंबई विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. उमेश काकडे यांची बदली अमरावती विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक पदी, अमरावतीच्या विभागीय सहसंचालक डॉ. नलिनी टेंभेकर यांची सोलापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव येथील विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांना नागपूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक पदाची, नागपूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ .संजय ठाकरे यांच्याकडे जळगाव सहसंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आणखी वाचा-पुणे महापालिकेच्या दहा हजार कंत्राटी कामगारांची दिवाळी गोड
मुंबई येथील एलफिस्टन महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय जगताप यांच्याकडे कोकण विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला गेला आहे. तर उच्च शिक्षण संचालनालयातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी डॉ. हरिभाऊ शिंदे यांच्याकडे मुंबई विभागाचा अतिरिक्त सहसंचालक पदाचा कार्यभार तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आला आहे. नांदेड विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. रामकृष्ण धायगुडे यांचा कार्यभार संपुष्टात आणण्यात आला आहे.