तृतीयपंथीयासाठी सरकारने तयार केलेल्या बिलात भाजपा सरकारने अनेक चुका केल्या, असा आरोप करत आज पुण्यात तृतीयपंथीयांकडून निषेध नोंदवण्यात आला. हे बिल सरकारने चुकीच्या अटीसह मंजूर केल्याचे तृतीयपंथीयांचे म्हणणे आहे. पुण्यातील संभाजी बागेसमोर या बिलाच्या प्रती जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तृतीयपंथी चांदणी गोरे म्हणाल्या की, लोकसभेत तृतीयपंथीय व्यक्तीसाठी जे बिल मंजूर केले आहे, त्यामध्ये अनेक जाचक अटी आहेत. गुरूकडे राहायचे असेल तर कोर्टाची परवनगी लागेल, दुकानावर जाऊन पैसे मागायचे नाही. मूल दत्तक घ्यायचे असल्यास न्यायालयाची परवनगी लागेल अशा नियमांचा समावेश आहे.

ही नियमावली जाचक असून ती आम्हाला मान्य नाही. या बिलात सरकारने बदल करावा अन्यथा भविष्यात आम्ही तीव्र लढा उभारू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
त्या पुढे म्हणाल्या, सरकारने आमच्यासाठी रोजगार निर्माण करावा. समाजातील सर्व घटकांसाठी हेल्पलाईन आहे, त्याप्रमाणे आमच्यासाठीही हेल्पलाईन सुरू करावी. स्त्री-पुरुषांप्रमाणे आम्हालाही हक्क द्या. आमच्या कुटुंबाकडून किंवा समाजाकडून आम्हाला स्वीकारले जात नाही. यासाठी सरकारने पुढाकार घेऊन काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यावेळी तृतीयपंथीयांकडून मोदीं सरकारचा निषेध करणारी पोस्टर हातात घेऊन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.

Story img Loader