पुणे : महापालिकेच्या सुरक्षा विभागात लिंगभेदाला छेद देत तृतीय पंथियांचादेखील समावेश करण्यात आला आहे. मुख्य प्रवाहात त्यांनादेखील सामावून घेण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. एक संतसाहित्याचे अभ्यासक आणि उत्कृष्ठ किर्तनकार तृतीयपंथी राजू ऊर्फ सान्वी डोईफोडे हे सुरक्षा रक्षक म्हणून सेवेत रुजू झाले आहेत. त्यांनी पुणे महापालिका भवनाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडताना किर्तनाची सेवा देण्याचा मानस लोकसत्ता डॉट कॉमसोबत संवाद साधताना व्यक्त केला.
राजू डोईफोडे म्हणाले, माझे आयुष्य इतरांसारखच होते. सर्व सामान्य कुटुंबात लहानाचा मोठा झालो. पण वयाच्या दहाव्या वर्षी आयुष्यात एक वादळ आले. ते म्हणजे आपण काही तरी वेगळे आहोत, असे जाणवू लागले. तो माझा गैरसमज असेल म्हणून मी अभ्यासात किंवा खेळामध्ये मन रमण्याचा प्रयत्न केला. मला कीर्तनाची आवड आहे. त्याचदरम्यान मी आळंदी येथील एका संस्थेत कीर्तनाचे शिक्षण घेतले. पण माझी चालण्याच्या आणि बोलण्याच्या पद्धतीवर त्या ठिकाणी काहीजण चिडवू लागले. तरीदेखील मी माझे शिक्षण पूर्ण केले आणि एक दोन ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रमदेखील झाले. पण मला पुन्हा तोच अनुभव आला. त्यामुळे मी कीर्तन सेवा सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माझ्यासोबत घडलेला प्रकार आणि मी कोण आहे, याबाबत घरातील मंडळींना सांगितले. त्यावर सर्वांना धक्काच बसला. माझी सर्वांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण माझे मन मी कोण आहे हे सारख समोरच्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करित होते. त्यावेळी माझ्या घरच्या मंडळींसह समाजानेदेखील मला नाकारले.
मी घरातून बाहेर पडलो आणि दोन मित्रांसोबत काही दिवस राहिलो. मी काम शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र कामदेखील मिळाले नाही. त्यावर मी रस्त्यावर पैसे मागून दिवस काढत होतो. त्याच दरम्यान पुणे महापालिकेमध्ये तृतीयपंथी व्यक्तींना सुरक्षा रक्षक म्हणून जागा असल्याची जाहिरात पाहिली. त्यावर मी अर्ज केला आणि प्रशासनाच्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झालो आहे. मला आज खूप आनंद होत असून आता खऱ्या अर्थाने सन्मानाने जगणे शक्य होणार आहे. पण आज मला कुटुंबियांनी आणि समाजाने स्वीकारले नाही. याबाबत दुःख वाटत आहे.
राजू पुढे म्हणाले की, मी आता सुरक्षा रक्षक म्हणून महापालिकेच्या सेवेत आहेच. पण मी एक कीर्तनकार म्हणून सेवा सुरू केली होती. त्यामध्ये काही काळ खंड पडला होता. आता पुन्हा कीर्तनकार म्हणून पण साडीच्या वेशात कीर्तन करण्याची इच्छा आहे. मी सुरक्षा रक्षक आणि कीर्तनकार हे दोन्ही काम पुढील काळात करित राहणार आहे. तसेच आम्ही सर्व तृतीयपंथी समाजाचा एक घटक असून आम्हालादेखील सामावून घ्या असे आवाहनदेखील यावेळी करण्यात आले.
हेही वाचा – चंद्रपूर: आमदार सुभाष धोटे यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
या भरती प्रक्रियेबाबत पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले की, तृतीयपंथी हे समाजातील घटक असून त्यांनादेखील सन्मानाने जगता यावे यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तृतीयपंथींना सुरक्षा रक्षक या कामासाठी २५ जागा भरण्याचा निर्णय घेतला. त्या जागांसाठी ३३ अर्ज आले. त्यापैकी दहाजणांना सेवेत घेतले असून यापुढील काळात उर्वरित जागा लवकरच भरल्या जाणार.